लोकमत न्यूज नेटवर्क
गुहागर : तालुक्यात सिंचन व पिण्याच्या पाण्यासाठी वापर होत असलेली मोडकाआगर व पिंपर अशी दोन धरणे असून, यामधील मोडकाआगर धरण १५ जूनलाच पूर्ण भरले आहे.
येथील परिसर सिंचनाखाली आणून शेती क्षेत्रातील विकास करण्याच्या उद्देशाने १९७३ मध्ये मोडकाआगर धरण बांधण्यात आले. याबाबत लघुपाटबंधारे विभागाकडून दिलेल्या माहितीनुसार, धरण क्षेत्र ११.६५ स्क्वेअर किलोमीटर आहे. धरणाची साठवण क्षमता ४.४७ दशलक्ष घनमीटर असून, प्रत्यक्ष उपयुक्त साठा ४.०५ दशलक्ष घनमीटर आहे. धरणाची उंची २० मीटर असून, धरणाची मुख्य भिंत काळ्या दगडाची आहे. धरणातून पाणी बाहेर सोडण्यासाठी चार दरवाजे आहेत.
मोडकाआगर धरणावर गुहागर नगरपंचायतीसह असगोली, पाटपन्हाळे, पालशेत या ग्रामपंचायतींच्या नळपाणी योजना कार्यरत आहेत. धरण झाल्यापासून जवळपास चाळीस वर्षे कोणतीही डागडुजी करण्यात आली नव्हती. त्यामुळे धरणाच्या सांडव्यातून पाच वर्षांपूर्वी मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली होती. हे लक्षात घेऊन पाटबंधारे विभागाकडून सांडव्याच्या आतील बाजूने काँक्रिटीकरण व मातीचा भराव टाकून मजबुतीकरण करण्यात आले. भविष्यात धरणाची भिंत आणखी मजबूत करण्याच्या उद्देशाने जलसंपदा खात्याकडून सांडव्याच्या भिंतीच्या स्टील काँक्रिटसाठी तब्बल ३२ लाख रुपये मंजूर झाले असून, पावसाळ्यानंतर हे काम सुरू केले जाणार असल्याची माहिती पाटबंधारे विभागाकडून देण्यात आली.
पिंपर धरणातही मोठ्या प्रमाणात पाणी साठा होत असून, आजूबाजूचे क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. धरणाची १.४६ दशलक्ष घनमीटर उपयुक्त साठा क्षमता आहे. या धरणातून अडूर ग्रामपंचायतीसाठी नळपाणी योजना राबवली जात आहे.