मंडणगड : मंडणगड बसस्थानकातील वाढलेल्या गर्दीचा फायदा घेत महिलेच्या गळ्यातील सोन्याची मोहनमाळ चोरुन पलायन करणाऱ्या महिलेला पाले येथील ग्रामस्थ सुरेश दुसार यांनी समयसूचकता दाखवत बसस्थानकावरील पोलिसांच्या सहाय्याने पकडले. चोरी करुन स्टँडमधून पसार झालेल्या या महिलेचा प्रथम दुसार व त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करत या महिलेला ताब्यात घेतले. सरला उर्फ शारदा बाबुराव सकट (रा. रेणुका मंदिरजवळ, निपाणी, बेळगाव) हिला या चोरी प्रकरणी अटक करण्यात आले आहे. तिच्याबरोबर अन्य दोन साथीदार असण्याची शक्यता पोलिसांनी वर्तवली असून, त्यादृष्टीने पुढील तपास सुरु आहे. राजश्री केशव जोशी (६८, रा. पालवणी) यांनी पोलीस स्थानकात सदर महिलेविरोधात तक्रार दाखल केली आहे. शनिवारी दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. जोशी या पालवणी गाडीत चढत असताना त्यांच्या गळयातील सोन्याची साठ हजार रुपये किंमतीची मोहनमाळ आरोपी महिलेने खेचली व बसस्थानकातून पळ काढला. यावेळी बसस्थानकात उभ्या असलेल्या सुरेश दुसार यांच्या महिलेच्या गळ्यातील माळ चोरल्याचे लक्षात आल्याने त्यांनी चोरी करणाऱ्या महिलेचा पाठलाग सुरु केला. ही महिला पळत असतानाच दुसार यांनी आरडाओरडा केल्याने यावेळी वाहूतक नियंत्रण व गणेशोत्सवाच्या बंदोबस्ताकरिता ड्युटीवर असलेल्या पोलिसांंनीही सदर महिलेचा पाठलाग सुरु केला. ही महिला शहरातील पाट रस्त्याकडे वळली असता, दुचाकीवरुन तिचा पाठलाग करण्यात आला. यानंतर काही अंतरावर या महिलेला चोरलेल्या मोहनमाळेसह ताब्यात घेण्यात आले. यावेळी पोलिसांनी प्रसंगावधान राखत या महिलेला ताब्यात घेतले. दुसार यांच्या समयसुचकेतमुळे चोरी करणाऱ्या महिलेला पकडण्यात यश आले. दुसार यांनी दाखविलेल्या प्रसंगावधनामुळेच पोलिसांना या महिलेला पकडणे शक्य झाले. मंडणगड शहरातील चेन स्नॅचिंगची ही पहिलीच घटना असल्याने दिवसभर या चोरी व पाठलागाचीच चर्चा परिसरात सुरु होती. मंडणगड पोलीस स्थानकात सदर महिलेविरोधात गुन्हा दाखल झाला असून, पोलीस निरीक्षक विश्वास गोळे यांच्या मार्गदर्शनाखाली अधिक तपास सुरु आहे. या चोरीमध्ये सदर महिलेसह आणखी काहीजणांचा सहभाग असण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात आली आहे. (प्रतिनिधी) चौकशी सुरु : अनेक गुन्हे उलगडणार? ही महिला कुख्यात असल्याचे म्हटले जात असून, तिने यापूर्वीही अशाच चोऱ्या केल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळे तिच्या अटकेतून अनेक गुन्ह््यांची उकल होण्याची शक्यता आहे. सध्या ती मंडणगड पोलिसांच्या ताब्यात आहे. या महिलेची चौकशी पोलीस करत आहेत.
मोहनमाळ चोरणाऱ्या महिलेला पकडले
By admin | Published: September 04, 2016 11:21 PM