रत्नागिरी : पर्यायी कोंडवाड्याची व्यवस्था जोपर्यंत होत नाही तोपर्यंत रत्नागिरी नगरपरिषदेने मोकाट फिरणाऱ्या जनावरांना पकडू नये, अशी मागणी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे करण्यात आली आहे. मोकाट जनावरांना पालिकेजवळील एका इमारतीच्या तळघरात डांबून ठेवले जाते.
सांडपाणी मुख्य रस्त्यावर
चिपळूण : येथील बाजारपेठेतील परकार कॉम्प्लेक्सशेजारी असणाऱ्या श्री कॉम्प्लेक्सच्या चेंबरमधून मुख्य रस्त्यावर सांडपाणी वाहत असल्याने नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागत आहे. वारंवार हा प्रकार सुरू आहे. नगरपालिकेसह या कॉम्प्लेक्सचे व्यवस्थापनही त्याकडे दुर्लक्ष करत आहे.
गणेशभक्तांचा प्रवास खड्ड्यातूनच
चिपळूण : गणरायाच्या विसर्जनानंतर गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासासाठी एस. टी., महामंडळाने मुंबईतील विविध भागांत व उपनगरांत जाणाऱ्या गाड्यांची व्यवस्था केली आहे. मात्र, येताना खड्ड्यांतून आलेल्यांना परतीचा प्रवासही खड्ड्यांच्या सामना करावा लागत असल्याने गणेशभक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त केली,
खाडीतील गाळ काढण्याची मागणी
दापोली : गेले कित्येक वर्षांपासून आंजर्ले खाडीतील साचलेला गाळ काढण्याचा रखडलेला प्रस्ताव मंजूर होऊन निधी आलेला असतानाही अजूनही कामाला सुरुवात झालेली नाही; तसेच शासनाला अजून किती नौकांची जलसमाधी बघायची आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया मच्छिमारांकडून उमटत आहे.