राजापूर : तालुक्यातील मळे शेती व आंबा, काजू बागेमध्ये माकडांच्या सातत्याने मोठ्या प्रमाणात होणाऱ्या उपद्रवामुळे शेतकरी कमालीचे हैराण झाले आहेत. या माकडांचा उपद्रव थांबविण्यासाठी शासकीय पातळीवरून उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी करत आहेत.
सद्यस्थितीत अनेक गावांमधील शेतकऱ्यांची कुळीथ काढणी, झोडणी संपत आली आहे, तर काही गावात तर ती अंतिम टप्प्यावर आली आहे. यावर्षी पर्यावरणातील प्रतिकूल बदलामुळे आंबा व काजू उत्पादन मुळातच कमी झाले आहे. त्यामुळे आधीच तोट्यात असलेले शेतकरी माकडांच्या उपद्रवामुळे हैराण झाले आहेत.
भात कापणी पूर्ण झाल्यावर शेतमळे पूर्ण रिकामे होतात. मात्र ग्रामीण भागात शेतजमिनीला कुंपण करून मळ्यामध्ये अन्य हंगामी पिके घेतली जातात.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदावलेली आर्थिक स्थिती व परिसीमा गाठलेली महागाई पाहता, शेतकरी कुळीथ व अन्य भाजीपाल्याचे पीक घेण्यासाठी सरसावले आहेत. या कालावधीत कुळीथ पिकासह, चवळी, कडवे, मूग, मटकी, वाल, मुळा, पावटा आदी पिकांचे उत्पादन घेतलेजाते. मात्र माकडांचा उपद्रव ही त्यांच्यासाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.