लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : गेल्या पंधरा दिवसांपासून जिल्ह्यातील तापमानात मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. त्यामुळे आता एप्रिल महिना सुरू होताच यापुढे अधिक तापमानातील वाढ जिल्ह्याला हैराण करणार आहे. गेल्या काही दिवसांपासून तापमानाचा पारा ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचला आहे.
आतापर्यंत रत्नागिरीचे तापमान जास्तीत जास्त ३६ अंश सेल्सिअसपर्यंत जात असे. मात्र, आता त्यात २ ते २.५ अंशांपर्यंत वाढ झाली आहे. गेल्या आठवड्याच्या शेवटी जिल्ह्यात उष्णतेची लाट निर्माण झाल्याने या कालावधीत जिल्हावासीयांना उकाड्याने हैराण केले होते. वाढत्या तापमानाबरोबरच दमट वातावरणामुळे वाहणाऱ्या घामाच्या धारांनी नागरिक मेटाकुटीस आले आहेत.
या वर्षी पावसाचे आगमन डिसेंबर महिन्यापर्यंत लांबले. त्यानंतरही फेब्रुवारी महिन्यात कोसळलेल्या अवकाळी पावसाने जिल्ह्यात थंडीचे वातावरण निर्माण केले. त्यामुळे रत्नागिरीकरांना थंडीचा सुखद अनुभव मिळत होता.
मात्र, त्यानंतर अचानक उष्णता वाढू लागली आहे. गेल्या आठवड्यात तीन दिवस आलेल्या उष्णतेच्या लाटेने हैराण केले. एप्रिल महिन्यात तर उष्णता अधिक वाढणार आहे.
शुक्रवारचे रेकाॅर्ड
गेल्या आठवड्यात शुक्रवार, २६ मार्च रोजी रत्नागिरी जिल्ह्याचे सर्वाधिक तापमान ३८ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते.
सोमवार, २२ मार्च रोजी ३१ अंश सेल्सिअस तापमान होते. या आठवड्यातील सर्वात कमी या दिवशीचे तापमान नोंदविले गेले.
असा राहील आठवडा
आगामी आठवड्यात जिल्ह्याचे कमाल तापमान ३३ ते ३४ अंश सेल्सिअस राहणार असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
जिल्ह्याचे किमान तापमान २५ ते २७ अंश सेल्सिअस इतके राहणार असल्याची शक्यता दिसत आहे.