संदीप बांद्रे
चिपळूण : तीस वर्षांहून अधिक जुन्या असलेल्या ३०हून अधिक इमारती धोकादायक बनल्या आहेत. या इमारतधारकांना केवळ नोटीस बजावून नगररचना विभाग गप्प बसून आहे. त्यामुळे पावसाळ्यात काही इमारतींपासून धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. याविषयी वेळोवेळी ओरड होऊनही प्रशासन गांभीर्याने लक्ष देत नसल्याचे काही नगरसेवकांकडून सांगण्यात आले.
कोकणातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या चिपळूण शहरात १९९०मध्ये बहुतांशी कौलारू घरे होती. मात्र, त्यानंतर शहरात दोन ते तीन इमारती उभारण्यात आल्या. १९९५ पासून मात्र एकापाठोपाठ एक इमारती उभ्या राहिल्या. तेव्हापासून खऱ्या अर्थाने शहर झपाट्याने वाढत गेले. सद्य:स्थितीत शहरात ६५० इमारती असून, ७५०० सदनिकाधारक आहेत, तर मालमत्ताधारक सुमारे २२ हजार इतके आहेत. यातील बहुतांशी इमारती नवीन आहेत. मात्र ज्या इमारतींना ३० वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे, अशा इमारती धोकादायक मानल्या जात आहेत.
सध्या शहरात तीसहून अधिक इमारती धोकादायक स्थितीत आहेत. त्यांना नोटीस बाजावण्यात आल्या आहेत. काही इमारतधारकांना तीन-चार वेळा नोटीस बजावूनही संबंधित बांधकाम तोडलेले नाही तसेच नगररचना विभागाकडून त्यांच्यावर कोणती कारवाईही केली जात नाही. त्यामुळे त्या त्या भागातील नागरिकांना अक्षरशः जीव मुठीत धरून ठेवण्याची वेळ आली आहे. शहरातील खेड चौकी येथील महाकाळ यांची १९६६ मधील विकास नावाची इमारत धोकादायक बनली असून, त्यांना नगरपरिषदेने अनेकदा नोटीस बजावली आहे. परंतु आजही हे बांधकाम धोकादायक स्थितीत जैसे थे आहे. तसेच परकार कॉम्प्लेक्सच्या परिसरातील परकार प्लाझा सी विंग या इमारतीचा मागील भाग खचला आहे. शिवनदीला अगदी लागून ही इमारत असल्याने या इमारतीलाही नगरपरिषदेने नोटीस बजावली आहे. याच पद्धतीने शहरातील राधाकृष्णनगर येथील इंद्रप्रस्थ इमारत व अन्य काही इमारती धोकादायक स्थितीत आहेत.
------------------------
रहिवासी आले अडचणीत
काही वर्षांपूर्वीच्या इमारतींसाठी बांधकाम पूर्णत्वाचा दाखला काही बांधकाम व्यावसायिकांनी घेतलेला नाही. दाखला नसतानाही अनेक रहिवासी त्या इमारतींमध्ये राहत आहेत. आता बांधकाम व्यावसायिक जागेवर नसल्याने व तेथील रहिवाशांना सहकार्य करीत नसल्याने अनेक रहिवासी अडचणीत आले आहेत. त्यातच जुन्या इमारती असल्याने स्ट्रक्चरल ऑडिट करायचे कोणी, असा प्रश्नही रहिवाशांच्या पुढे निर्माण झाला आहे.
-----
जुन्या व धोकादायक इमारतींविषयी नगररचना विभागाने गांभीर्याने लक्ष द्यायला हवे. नुकताच पहिल्या इमारतीचा पूर्णत्वाचा दाखला घेतला नसेल तर दुसऱ्या इमारतीला परवाना देऊ नये, असा ठराव झाला आहे. परंतु त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. उलट सरसकट परवानगी दिली जात आहे. धोकादायक इमारतींबाबत तत्काळ कार्यवाही होणे गरजेचे आहे.
- आशिष खातू, नगरसेवक, चिपळूण
---------------------------------
तूर्तास शहरातील धोकादायक इमारतींचा स्वतंत्र सर्व्हे झालेला नाही. मात्र त्या त्या भागातील धोकादायक इमारतधारकांना नोटिसा बजावल्या आहेत. याशिवाय दरवर्षी ३० वर्षापेक्षा जुन्या असलेल्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घ्यावे, असे जाहीर आवाहन केले जाते. मात्र तरीही बांधकाम काढून घेतले न गेल्यास त्यांच्यावर कारवाई केली जाईल व त्यासाठी येणारा खर्चदेखील त्यांच्याकडूनच वसूल करण्यात येईल.
- अनंत मोरे, प्रशासकीय अधिकारी, नगर परिषद, चिपळूण
------------------------------------
चिपळूण शहरातील खेंड चौकी येथील विकास इमारत अत्यंत धोकादायक स्थितीत असून, नगरपरिषदेने वेळोवेळी नोटीस बजावली आहे.