खेड : तालुक्यातील नदी, पऱ्या, छोटे ओहोळ अशा वाहते पाणी असलेल्या परिसरातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील लावण्या पूर्ण केल्या असल्या तरी सद्यस्थितीत पावसाने दडी मारल्याने डोंगर उतारावरील शेतकऱ्यांच्या शेतातील लावण्या पावसाअभावी रखडल्या आहेत. लागवडीसाठी तयार झालेली रोपे उन्हाच्या तडाख्यात करपण्याची भीती शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
गेल्या आठवड्यापासून कोकणात पावसाने दडी मारल्याने ऐन भात लावणीच्या हंगामात शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले आहे. भाताची पेरणी झाल्यानंतर आवण काढून भाताची लावणी करण्यासाठी पावसाची गरज असते. मात्र, गेल्या आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने खेडमधील डोंगर उतारावर शेती करणारा शेतकरी हवालदिल झाला आहे. गतवर्षी अतिवृष्टी व वादळात उभे पीक नष्ट झाले तर यावर्षी पेरणीयोग्य पाऊस पडला असला तरी उगवलेली रोपे लावणीसाठी शेतात चिखल करण्यासाठी पाणीच नाही. पाऊस नसल्याने ऊन्हात रोपे नष्ट झाल्यास दुबार पेरणी करावी लागण्याची भीती व्यक्त होत आहे. एका बाजूला कोरोनामुळे लॉकडाऊन झाल्याने नोकरी हिरावली तर लहरी हवामानामुळे शेतीतील तोंडचा घास हिरावण्याची शक्यता असल्याने कोकणातील शेतकरी चिंतातूर झाले आहेत.
--------------------------
बादलीने पाणी शेतात
ग्रामीण भागात काही शेतकरी गेल्या काही दिवसांपासून रस्त्याच्या बाजूच्या ओढ्या, नाल्यांमधून बादलीने पाणी शेतात आणून लावणी करत आहेत. आगामी काही दिवस पाऊस पडला नाही तर शेतातील लावणीयोग्य रोपे करपण्याची भीती शेतकऱ्यांतून व्यक्त होत आहे.
--
खेड तालुक्यात शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत आकाशाकडे डोळे लावून मिळेल त्या पाण्यावर लावणीयोग्य झालेली रोपे लावण्याचा प्रयत्न करत आहेत.