रत्नागिरी : आंब्याच्या दरात घट हाेत चारशे ते हजार रुपये डझन विक्री सुरू आहे. मात्र, आंबापेटी पाठविण्यासाठी वाहतूकभाड्यासह जीएसटीची रक्कम आकारली जात असल्याने आंब्याच्या किमतीपेक्षा वाहतूकभाड्यासाठी जास्त रक्कम मोजावी लागत असल्याने ग्राहकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातील विविध जिल्ह्यांतून नोकरी-व्यवसायासाठी स्थिरावलेली मंडळी, नातेवाईक, मित्रांना आंबा भेट देतात. ऐन हंगामात आंब्याचे दर गगनाला भिडलेले असतात, त्यामुळे स्थानिक बाजारपेठेत कमी आणि बाहेरच आंब्याची निर्यात अधिक हाेते़ या काळात आंबा खरेदी करण्याकडे ग्राहकांचा फारसा ओढा नसताे़ हंगामाच्या अंतिम टप्प्यात दरात घसरण झाल्यानंतर स्थानिक बाजारपेठेत आंबा दिसायला सुरुवात हाेते़ त्यानंतर नातेवाइकांना पाठविण्यासाठी खरेदी सुरू हाेते़ सध्या आंबा चारशे ते हजार रुपये दराने विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. घरपोच आंबापेटी पाठविण्यासाठी दर मात्र उच्च असल्याने आंबा खरेदीपेक्षा पेटी पाठविण्यासाठी जास्त पैसे माेजावे लागत आहेत. मुंबई, पुणे, कोल्हापूर येथे दोन डझनचा बाॅक्स पाठवण्यासाठी २८० रुपये तर लाकडी आंबापेटीला ३० रुपये किलो, शिवाय १८ टक्के जीएसटीची रक्कम आकारण्यात येत आहे़ चार डझनचा बाॅक्स मात्र ४० रुपये किलाे, तर विदर्भात आंबा पाठविण्यासाठी ४५ रुपये किलो अधिक जीएसटीची रक्कम, तर दोन डझनच्या बाॅक्ससाठी ३०० रुपये दर आकारण्यात येत आहे. त्यामुळे वाहतूकभाड्याची रक्कम परवडत नसल्याची प्रतिक्रिया ग्राहकांमधून उमटत आहे.
घरपोच सेवेसाठी डिलिव्हरी बाॅय तसेच वाहनचालक किलोवर दर आकारतात. शिवाय, काही ग्राहक चार डझनची पेटी सांगून त्यामध्ये पाच ते सहा डझन आंबा भरतात. साहजिकच, पेटीचे वजन वाढते. ग्राहकांकडून दिशाभूल करण्यात येत असल्यानेच वाहतूकभाड्यात वाढ करण्यात आली असून, वजनावरच पेटीचे भाडे आकारले जात आहे. दोन डझनांच्या बाॅक्सचे वजन आठ किलो भरते. त्यामुळे एकाच व्यक्तीला दोन बाॅक्स पाठविले जाणार असतील, तर ५६० रुपये दर न आकारता ग्राहकांकडून पाचशे रुपयेच घेण्यात येतात. चार डझनांची पेटी १४ ते १५ किलो, तर पाच ते सहा डझनांच्या पेटीचे वजन २२ ते २३ किलो भरते. त्यामुळे किलोसाठी दर निश्चित करण्यात आला असून, वाहतूकभाडे शिवाय जीएसटीची रक्कम आकारण्यात येत आहे.
कोट
सुरुवातीला पेटी व बाॅक्ससाठी स्वतंत्र दर निश्चित करण्यात आले होते. काही ग्राहक चार डझनांची पेटी सांगून पाच ते सहा डझन आंबापेटी भरून फसवणूक करतात. डिलिव्हरी बाॅय व वाहनचालक मात्र किलोवरच भाडे आकारत असल्यामुळे लमसम वाहतूकभाडे परवडत नाही. त्यामुळे किलोप्रमाणे पेटीचे वाहतूकभाडे व त्यावर जीएसटीची रक्कम आकारण्यात येत आहे.
- सुशील कुबल, कुरिअरचालक