मेहरुन नाकाडे
लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : कोरोनामुळे लाॅकडाऊन घोषित करण्यात आले असून जिल्हाबंदी लागू केली आहे. सामान्य प्रवाशांना अत्यावश्यक कारणाशिवाय प्रवास नाकारला आहे. जिल्ह्याबाहेरील प्रवासाला ‘ई’ पास आवश्यक केला आहे. राज्य परिवहन महामंडळाची सेवा अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी सुरू ठेवण्यात आली आहे. मात्र अत्यावश्यक सेवेतील १५ टक्के तर ३५ टक्के सर्वसामान्य प्रवासी प्रवास करीत आहेत. प्रवासासाठी कारणेही अनेक सांगत आहेत.
कोर्टात केस आहे, डाॅक्टरांकडे जायचे आहे, नातेवाईक आजारी आहेत, औषधे संपली आहेत, अंत्यविधीला जायचे आहे, पोलीस स्थानकात काम आहे आदी विविध कारणे सांगून एसटीतून सर्वसामान्य प्रवासी प्रवास करीत आहेत. काही प्रवासी डाॅक्टरांची फाइल जवळ ठेवत आहेत. तर काही कोर्टाची जुनी कागदपत्रे ठेवत आहेत. वाहकांने गाडीत बसण्यास मज्जाव केला तर चक्क्क हुज्जत घालत आहेत.
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांशिवाय एसटीत अन्य प्रवाशांना परवानगी देऊ नये, अशी सूचना एसटी प्रशासनाकडून करण्यात आली आहे. काही आगारांमध्ये काटेकाेरपणे सूचनांचे पालन करण्यात येत आहे. मात्र काही आगारांतून चालक-वाहकांना सूचना नसल्याने, रिकामी एसटी धावण्यापेक्षा प्रवाशांना गाडीत घेतले जात आहे. काही मार्गांवर तर मासळी विक्रेतेसुद्धा एसटीतून प्रवास करीत आहेत.
महामंडळाने प्रवासी क्षमतेपेक्षा पन्नास टक्के प्रवासी वाहतुकीला परवानगी दिली आहे. त्यानुसार एका सीटवर एकच प्रवासी बसण्यासाठी वाहक सूचना करीत असले तरी प्रवासी मात्र ऐकत नाहीत. तुम्हाला काय करायचे, आमची काळजी आम्ही घेऊ, या शब्दांत वाहकांशी वाद घालत असल्याने असे प्रवासी मात्र एसटी कर्मचाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहेत. नाइलाजास्तव प्रवासी घ्यावे लागतात.
तीच ती कारणे
- अंत्यविधीला जायचे आहे. नातेवाईक आजारी आहेत.
- डाॅक्टरांकडे उपचारासाठी जायचे आहे, औषधे संपली असल्याचे सांगून डाॅक्टरांची फाइल दाखवत आहेत.
- कोर्टात आज तारीख आहे, पोलीस स्थानकात काम आहे, सांगत जुनी कागदपत्रे पुढे केली जातात.
- प्रवासासाठी चक्क एसटीत घुसखोरी केली जाऊन वाद घातला जातो.
खंडाळा मार्गावर गर्दी
खासगी वाहतूक बंद असल्याने एसटीकडे प्रवाशांचा ओढा अधिक आहे. खंडाळा, जयगड मार्गावर प्रवाशांची गर्दी वाढली आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची संख्या मोजकीच असली तरी अन्य प्रवासी अधिक आहेत.
एसटी कर्मचाऱ्यांसाेबत वाद
अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र असते. मात्र जिल्ह्याबाहेरील प्रवाशांकडे ई-पास असणे आवश्यक आहे. मोजक्या प्रवाशांकडे ई-पास असतो. अन्यथा एसटीतून प्रवास करण्यासाठी कर्मचाऱ्यांबरोबर प्रवासी वाद घालतात. मटका, दारूसाठीही प्रवास करणारी मंडळी आहेत.
एसटीमध्ये फक्त अत्यावश्यक सेवेतील प्रवाशांना घेण्याच्या सूचना कर्मचाऱ्यांना करण्यात आल्या आहेत. सर्वसामान्य प्रवाशांकडे ई-पास असेल तर प्रवेश देण्याची सूचना करण्यात आली आहे. सर्व कर्मचारी याचे तंतोतंत पालन करीत आहेत. मात्र, काही प्रवासी डाॅक्टरांची फाइल दाखवत असल्याने प्रवाशांना गाडीत घ्यावे लागते.
- सुनील भोकरे, विभाग नियंत्रक, रत्नागिरी