रत्नागिरी: जयगड : जागरूक नागरिक बनूया आणि कोरोनाला हरवूया या तत्त्वावर काम करीत जेएसडब्ल्यूसीएसआर प्रकल्प अंतर्गत हक्कदर्शक संस्थेने जयगड पंचक्रोशीतील हजारपेक्षा अधिक नागरिकांची कोविड लसीसाठी नोंदणी पूर्ण केली.
मागील २ वर्षांपासून हकदर्शक ऑर्गनायझेशन जयगड पंचक्रोशी ग्रामपंचायतमधील नागरिकांना सर्व शासकीय योजनांविषयी माहिती देऊन जागरूक करतानाच योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठीसुद्धा प्रयत्न करत आहे. सध्याच्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेता, कोविड लसीविषयी नागरिकांच्या मनामध्ये बरेच गैरसमज व भीतीचे वातावरण निर्माण झाल्याचे दिसून येत आहे, नागरिकांमध्ये असलेली भीती दूर करण्याकरिता जयगड पंचक्रोशी ग्रामपंचायतमधील सर्व सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, गावचे, वाडीचे अध्यक्ष व मौलाना अशा सर्व प्रमुखांशी कोविड लसीविषयी चर्चा करत आहे. पंचक्रोशी व ग्रामपंचायतीमधील प्रत्येक वाडीत घरोघरी जाऊन नागरिकांना कोविड लसीकरणासंदर्भात माहिती देऊन भीती आणि काही गैरसमज दूर करून लसीकरणाचे महत्त्व पटवून दे आहे. कोरोना लससाठी आतापर्यंत जवळपास १००० पेक्षा अधिक नागरिकांची ऑनलाईन नोंदणी करण्यात आली आहे.
नागरिकांना कोविडविषयक योजना व लसीबद्दल जागरूक करून आणि लसीचे महत्त्व सांगून सर्वांची ऑनलाईन लस नोंदणी करून घेण्याचे उद्दिष्ट हक्कदर्शक (जेएसडब्ल्यू.) टीमने हाती घेतले आहे. या कामाचे पंचक्रोशीतून कौतुक होत आहे. येथील सर्व ग्रामपंचायतीमधून अतिशय चांगले सहकार्य मिळत असून लोकप्रतिनिधीसुद्धा लोकांच्या घरोघरी फिरत आहेत, अशी माहिती हक्कदर्शकचे जिल्हा समन्वयक मयूर पिंपळे यांनी दिली. त्यांच्या समवेत अमोल लाखण, अमोल मडावी तसेच हक्कदर्शकचे सर्व ग्राम मित्र दिवस-रात्र नागरिकांसाठी काम करीत आहेत.