चिपळूण : सुमारे १८ वर्षे जुन्या असलेल्या डॉन रेसिडेन्सी या इमारतीतील रहिवाशांनी सहकारी गृहनिर्माण सोसायटी स्थापन करण्याची व अभिहस्तांतरणाबाबत अनेकदा मागणी करुनही त्यास टाळाटाळ करुन दुर्लक्ष केल्याप्रकरणी येथील एका बांधकाम व्यावसायिकावर मोफा (महाराष्ट्र ओनरशिप फ्लॅटस् अॅक्ट) कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.लियाकत अली शमशुद्दिन कासकर (६५, रा. पाग कासकरआळी) असे गुन्हा दाखल झालेल्याचे नाव आहे. याबाबतची फिर्याद तानू काशिराम आंबेकर (रा. डॉन रेसिडेन्सी) यांनी दिली आहे. आंबेकर यांनी तक्रारीत म्हटले आहे की, सिटी सर्व्हे नं. ६३४१ (अ) २ या महसूल भूमापन क्रमांकावर डॉन रेसिडेन्सी ही इमारत बांधण्यात आली आहे.
या इमारतीत १४ सदनिकाधारक असून, तळमजल्यावर आठ दुकान गाळ्यांचा समावेश आहे. त्याची विक्री होऊन अनेक वर्षे झाली आहेत. या मिळकतीचे मूळ कागदपत्र, कुलसुमबी इस्माईल देसाई व लियाकत अली शमशुद्दिन कासकर यांचे खरेदीखत, इमारतीचा प्रमाणित नकाशा, प्रॉपर्टी कार्डचा उतारा व बांधकाम परवाना आणि भोगवटा वापर प्रमाणपत्र आजतागायत कासकर यांच्या ताब्यात आहेत.
या मिळकतीतील सदनिकाधारक व गाळेधारक यांची सहकारी गृहनिर्माण सोसायटी करून हस्तांतरण करण्याची मागणी करण्यात आली होती. कासकर यांनी जाणीवपूर्वक ही मिळकत आजतागायत आपल्या ताब्यात ठेवली आहे.
दरम्यान, सोसायटी व अभिहस्तांतरण करण्याबाबत वारंवार विनंती करण्यात आली. त्यांनी आजतागायत त्याची पूर्तता केली नाही. याप्रकरणी या बांधकाम व्यावसायिकावर मोफा कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक मन्सूर मणेर करीत आहेत.या इमारतीसाठी सहकारी गृहनिर्माण सोसायटी होण्याबाबत आंबेकर यांनी प्रयत्न करुनही सहकारी संस्था सहनिबंधकांकडे २०१४मध्ये प्रस्ताव दाखल केला होता. मात्र, या प्रस्तावाला कासकर यांनी अनुमती देण्यास नकार दिला. त्यामुळे हा प्रस्ताव परत आला.