काँग्रेसला स्वबळाचे स्वप्न; अन् शिवसेना स्वत:मध्ये मग्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2021 07:43 PM2021-12-03T19:43:40+5:302021-12-03T19:44:17+5:30
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सद्यस्थितीत प्रत्येक पक्षच आपली ताकद आजमावण्याच्या तयारीत आहे. या निवडणुकांच्या निकालांनंतर पुढच्या विधानसभा, लोकसभेची भूमिका निश्चित करण्यासाठी ही निवडणूक स्वबळावर लढवली जाणार आहे.
मनोज मुळ्ये
रत्नागिरी : काँग्रेसला सध्या स्वबळाचे स्वप्न पडू लागले असून, राष्ट्रवादीला आघाडी हवी असली तरी अजून हे दोन पक्ष एकत्र येण्याची कोणतीच शक्यता दिसत नाही. मोठी ताकद असल्याने शिवसेना कोणाशी हातमिळवण्याची करण्याची शक्यता नाही तर भाजपला कोणीही सोबत घेतलेले नाही. त्यामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील बहुतांश आगामी निवडणुका चारही प्रमुख पक्ष स्वबळावर लढण्याचीच शक्यता अधिक आहे.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यात स्वबळावर पुढे जाण्याची घोषणा केली आहे. काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनीही स्वबळाचीच री ओढली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसला सद्यस्थितीत आघाडी हवी असली तरी काँग्रेसच्या भूमिकेमुळे राष्ट्रवादीतर्फे खासदार सुनील तटकरे यांनीही जिल्ह्यात एकटेच राहण्याची भूमिका घेतली आहे.
जिल्ह्यात शिवसेना हा पहिल्या क्रमांकावर आणि ताकदवान पक्ष आहे. त्यामुळे कोणाशी हातमिळवणी करुन आपल्याच जागा कमी करण्याची शिवसेनेची तयारी नाही. भाजपला कोणीही सोबत घेतलेले नाही. त्यामुळे दापोली, मंडणगडमधील नगर पंचायत निवडणूक किंवा जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत चारही प्रमुख पक्ष स्वबळावरच पुढे जाण्याची शक्यता अधिक आहे.
आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सद्यस्थितीत प्रत्येक पक्षच आपली ताकद आजमावण्याच्या तयारीत आहे. या निवडणुकांच्या निकालांनंतर पुढच्या विधानसभा, लोकसभेची भूमिका निश्चित करण्यासाठी ही निवडणूक स्वबळावर लढवली जाणार आहे.
काँग्रेसला एकही सत्तास्थान नाही
जिल्हा परिषद, पंचायत समिती अशा कोणत्याही ठिकाणी काँग्रेसला सत्ता मिळालेली नाही. सत्ता नाहीच, पण काँग्रेसचे सदस्यही नाहीत. राष्ट्रवादी स्वतंत्र झाल्यानंतर काँग्रेसची जी पीछेहाट झाली, ती अजूनही भरुन निघालेली नाही. सध्या केवळ राजापूरचे नगराध्यक्षपद काँग्रेसकडे आहे.
विधानसभेत काँग्रेसचा अपयशाचाच आलेख
- विधानसभा निवडणुकांमध्ये जिल्ह्यात काँग्रेसचा आलेख फक्त अपयशाचाच आहे.
- २००९, २०१४ आणि २०१९ या तीनही विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसचा एकही आमदार नाही.
- काँग्रेससारखीच अवस्था भाजपची झाली आहे. गेल्या तीनही विधानसभेत भाजपला जिल्ह्यात यश मिळालेले नाही.
शिवसेनेच्या यशाची कमान चढतीच
- गेली २५ वर्षे रत्नागिरी जिल्ह्यात शिवसेनेचा वरचष्मा कायम आहे.
- १९९५ साली विधानसभेच्या सर्व जागा जिंकलेल्या शिवसेनेने तेव्हापासून स्थानिक स्वराज्य संस्थांवरील आपली पकड कायम ठेवली आहे.
- त्यामुळेच शिवसेना कोणाशी हातमिळवणी करणार नाही.
दुसऱ्या क्रमांकावरील राष्ट्रवादीची धडपड
- सद्यस्थितीत जिल्ह्यात राष्ट्रवादी हा दुसऱ्या क्रमांकावरील पक्ष आहे.
- पाचपैकी चिपळूणचे शेखर निकम हे राष्ट्रवादीचे एकमदेव आमदार आहेत. त्यांनी आपला गड अजून राखून ठेवला आहे.
- स्थानिक स्वराज्य संस्थेत राष्ट्रवादी काँग्रेसचे सहकार्य मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे.
निवडणुका लवकरच
- दापोली आणि मंडणगड या दोन नगर पंचायतींची निवडणूक जाहीर झाली आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रियाही सुरू झाली आहेे.
- जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुका फेब्रुवारीत होण्याची शक्यता आहे.
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष म्हणतात
काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अविनाश लाड यांनी अलिकडेच हे पद स्वीकारले आहे. मात्र त्यानंतरच्या आपल्या दोन दौऱ्यात त्यांनी स्वबळाचाच नारा दिला आहे. महाविकास आघाडी लांब राहिली, पण राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडी करण्यालाही काँग्रेसची तयारी नाही, असे चित्र सध्या तयार करण्यात आल्याने राष्ट्रवादीचे पदाधिकारीही आश्चर्य व्यक्त करत आहेत.