रत्नागिरी : गेले वर्ष महावितरणला वीजबिल वसुलीबाबत संघर्षमय होते. मात्र, तरीही महावितरणकडून ग्राहकांना वीजविषयक सर्व सेवा सुरळीत व अविरत देण्यात येत आहे. वर्षभरात कोकण प्रादेशिक विभागात सर्व वर्गातील २ लाख ८५ हजार ३३२ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत. त्यात रत्नागिरी जिल्ह्यात वर्षभरात १२ हजार ५६५ नवीन वीज जोडण्या देण्यात आल्या असून, कोरोना संकट काळातही महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी आपली सेवा चोख बजावली आहे. चिपळूण विभागात ३ हजार १४३, खेड विभागात ३ हजार २७९, तर रत्नागिरी विभागात ६ हजार १४३ वीज जोडण्या देण्यात आल्या आहेत.
महावितरणकडून दरवर्षी मागणीनुसार साधारणत: ९ ते १० लाख नवीन वीजजोडण्या दिल्या जातात. गतवर्षी मार्च ते जूनपर्यंत कोरोना रूग्ण वाढीमुळे नवीन वीज जोडण्या देण्याचा वेग मंदावला होता. इतर वीजसेवांप्रमाणेच नवीन वीजजोडणी देण्याच्या कामात कोणताही खंड पडला नाही. एप्रिल २०२० ते मार्च २०२१ या काळात उच्चदाब व लघुदाब वर्गातील आठ लाख दोन हजार ७८२ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या. यामध्ये सर्वाधिक जोडण्या कोकण प्रादेशिक विभागामध्ये दोन लाख ८५ हजार ३३२ देण्यात आल्या. त्यापाठोपाठ पुणे प्रादेशिक विभागात दोन लाख २८ हजार ६९३, नागपूर प्रादेशिक विभागात एक लाख ६५ हजार १८१ आणि औरंगाबाद प्रादेशिक विभागामध्ये एक लाख २३ हजार ५७१ नवीन वीजजोडण्या देण्यात आल्या आहेत.
कोरोना काळात वीजमीटरचा तुटवडा भासत होता. महावितरणकडून सिंगल फेजचे १८ लाख व थ्री फेजच्या एक लाख ७० हजार नवीन वीजमीटरचा पुरवठा करण्याचे आदेश पुरवठादारांना देण्यात आले. त्याप्रमाणे महावितरणच्या चारही प्रादेशिक कार्यालयांना मार्चअखेरपर्यंत तीन लाख ३५ हजार नवीन वीजमीटरचा पुरवठा करण्यात आला आहे. एप्रिल महिन्यात साडेतीन लाखांवर नवीन वीजमीटर पुरविण्याचे नियोजन आहे.
वीजमीटरअभावी ग्राहकांची कोणतीही गैरसोय होऊ नये म्हणून उपलब्ध झालेले मीटर तातडीने संबंधीत ग्राहकांकडे कार्यान्वित करण्याच्या सूचना मुख्य कार्यालयाकडून क्षेत्रीय कार्यालयांना देण्यात आल्या आहेत. ग्राहकांना खुल्या बाजारातून नवीन वीजमीटर खरेदी करण्याची आता आवश्यकता नसल्याचे महावितरणकडून स्पष्ट करण्यात आले आहे.