रत्नागिरी : राज्य सरकारने १ जून ते ३१ जुलै या दोन महिन्यांसाठी सागरी मासेमारीला पावसाळ्यात बंदी घातली आहे. मात्र, बंदी आदेश झुगारून अद्याप मासेमारी सुरू असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बंदीच्या पहिल्या तीन दिवसांमध्ये बंदी आदेश मोडून मासेमारी करणाऱ्या १० नौकांवर मत्स्य व्यवसाय विभागाकडून दंडात्मक कारवाईही करण्यात आली आहे. मात्र, रत्नागिरी विभागात मोठ्या प्रमाणात बंदी आदेशाचे उल्लंघन होत असताना नौकांवरील कारवाईचे प्रमाण अत्यल्प असल्याचा दावा स्थानिक मच्छिमारांमधून केला जात आहे.राज्याच्या सागरी क्षेत्रात पावसाळ्यात दरवर्षी दोन महिने मासेमारी बंदी आदेश लागू करण्यात येतो. यंदाही १ जूनपासून हा बंदी आदेश जारी झाला. मात्र, पहिल्याच दिवशी या आदेशाचे ७ मासेमारी नौकांनी उल्लंघन केले.
या नौकांमध्ये अतिक हमीद मिरकर (मिरकरवाडा, रत्नागिरी) यांची नौका मोहम्मद सियाम, साजीद हसनमियॉँ मिरकर (भाटकरवाडा, रत्नागिरी) यांची गोवर्धन प्रसाद, संजय रघुनाथ चव्हाण, (साखरहेदवी, गुहागर) यांची दशभूज लक्ष्मीगणेश, विष्णू भाग्या ढोर्लेकर (वेळणेश्वर, गुहागर) यांची पांडुरंग प्रसाद, आत्माराम हरी वासावे (रा. साखरीआगार, गुहागर) यांची पिंपळेश्वर सागर, दिलीप राघोबा नाटेकर (नवानगर, गुहागर) यांची सर्वेश्वरी, मोहम्मद रफीक अ. भाटकर (राजिवडा, रत्नागिरी) यांची नौका मोहम्मद शयान यांचा समावेश आहे. या सातही नौकांवरील २५,८०० रुपयांची मासळी जप्त करण्यात आली असून, गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.त्यानंतर ३ जूनला मत्स्य व्यवसाय विभागाने आणखी तीन मासेमारी नौकांवर बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याने कारवाई केली आहे. या नौकांमध्ये बशीर जैनुद्दीन सांग्रे (जयगड, रत्नागिरी) यांची बिस्मिल्ला स्टार्ट, विवेक सुर्वे (जयगड, रत्नागिरी) यांची जयगडचा राजा १, फत्तेमहम्मद हुसैन मुजावर (चालक, रा. जयगड) यांची हवा अल हसन यांचा समावेश आहे.यातील पहिल्या दोन नौकांना अधिकृत नंबरच नाही. विशेष म्हणजे अशा प्रकारच्या अनेक नौका कार्यरत असल्याचे मच्छिमारांचे म्हणणे आहे. या तीन नौकांमधून ४५१४ रुपयांची मासळी जप्त करण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कामगिरी मत्स्य व्यवसाय, रत्नागिरीचे सहाय्यक आयुक्त आनंद पालव, जयगडच्या परवाना अधिकारी तृप्ती जाधव, सुरक्षा पर्यवेक्षक तुषार करगुटकर यांनी केली आहे.२०१६च्या कायद्यानुसार राज्य सरकारने १ सप्टेंबर ते ३१ डिसेंबर हे चार महिनेच पर्ससीन मासेमारीला परवानगी दिली आहे. त्यामुळे १ जानेवारी ते ३१ मेपर्यंत पर्ससीन मासेमारीला बंदी आहे. असे असतानाही बंदीच्या काळातही पर्ससीन मासेमारी बेकायदा सुरू होती. आता पूर्ण बंदी असतानाही पुन्हा एकदा बंदी धुडकावून लावण्याचा प्रयत्न अनेक मासेमारी नौकांनी केला आहे. त्यामुळे शासकीय यंत्रणा दुबळी ठरत असून, बंदी मोडण्याची घातक प्रथा निर्माण होत असल्याने मच्छिमारांमध्ये अस्वस्थता आहे.