लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : बाळ आणि माता दोघांसाठीही कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित असल्याचा निर्वाळा आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ज्ञांनी दिला असल्याने आता गरोदर महिलांना यापुढे कोरोना प्रतिबंधक लस घेता येणार आहे.
कोरोना लस निर्मितीच्या वेळी कोरोना हा आजार नवीन असल्याने त्याबाबत आरोग्य क्षेत्रात त्यावरील लसीसंदर्भात संशोधनाला सुरूवात झाली. त्यामुळे पहिल्यांदा ही लस आरोग्य यंत्रणेतील डॉक्टर, परिचारिका तसेच अन्य आरोग्य यंत्रणेतील कर्मचारी यांना दिली गेली. दुसऱ्या टप्प्यात गंभीर आजार असलेले त्यापाठोपाठ ६० वर्षांवरील व्यक्तिंना देण्यास प्रारंभ झाला. सध्या १८ ते ४४ वयोगटातील व्यक्तिंना ही लस देण्याचे निर्देश शासनाने दिले असल्याने या वयोगटात लसीकरण सुरू झाले आहे.
लस निर्मिती झाल्यानंतर तिचा प्रयोग वेगवेगळ्या गटातील स्वयंसेवकांवर करण्यात आला होता. मात्र, गर्भवती महिेलेवर प्रयोग झाला नव्हता. त्यामुळे गर्भवती महिलांना रिस्क नको, म्हणून ही लस दिली जात नव्हती. मात्र, आता आराेग्य तज्ज्ज्ञांनी ही लस गर्भवती महिलांसाठीही निर्धोक असल्याचे स्पष्ट केले आहे.
कुणासाठी ही लस अधिक लाभदायी?
३५ वर्षांवरील, अति वजन असल्यास किंवा मधुमेह, रक्तदाब असा आजार असलेल्या महिलेला कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका असतो. त्यामुळे बाळालाही धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे गर्भवती महिलांनी कोरोना प्रतिबंधक लस घेणे गरजेचे आहे.
कोरोनामुळे प्रीमॅच्युअर प्रसुती किंवा बाळाचे वजन कमी असल्यास बाळाचा मृत्यू होण्याचा धोका वाढतो. हे टाळण्यासाठी आधीच लस घेणे फायद्याचे ठरते.
गर्भवती माता आणि तिच्या होणाऱ्या बाळासाठी कोरोना प्रतिबंधक लस लाभदायी असल्याचे संशाेधनाअंती सिद्ध झाले आहे.
कोरोना प्रतिबंधक लस ही होणाऱ्या बाळासाठी आणि मातेसाठी सुरक्षित असल्याचे आरोग्य तज्ज्ञांनी सिद्ध केेले आहे. त्यामुळे मातेला आणि तिच्या बाळाला कोरोना सुरक्षा कवच मिळणार आहे. त्यामुळे आता गर्भवती महिलांनी कुठलीही भीती न बाळगता कोरोना प्रतिबंधक लस घ्यावी.
- डाॅ. संघमित्रा फुले, जिल्हा शल्य चिकित्सक, रत्नागिरी
कोरोना हा आजार नवीन असल्याने त्यावर तयार करण्यात आलेल्या लसीचा प्रयोग करताना गर्भवती महिलांचा त्यात समावेश करण्यात आला नव्हता. मात्र, आता आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ज्ञांनी यावर संशोधन केले असून, गर्भवती महिलांना आणि होणाऱ्या तिच्या बाळालाही ही लस लाभदायी असल्याचे पुढे आले आहे.
- डाॅ. राहुल सांगवीकर, प्रसुतितज्ज्ञ, जिल्हा शासकीय रूग्णालय, रत्नागिरी