लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : ‘प्रधानमंत्री मातृ वंदना योजना’ सन २०१७ पासून देशभर राबविण्यात येत आहे. माता व बालकांचे आरोग्य सुधारण्यासाठी सकस आहार घेण्यास प्रोत्साहित करणे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
या योजनेच्या लाभार्थी मातेच्या पहिल्या अपत्यासाठी बँक खात्यामध्ये रक्कम जमा करण्यात येते. रत्नागिरी जिल्ह्यात सध्या या योजनेअंतर्गत १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत मातृ वंदना सप्ताह राबविण्यात येत आहे. या सप्ताहात तब्बल ३३८ माता या योजनेसाठी पात्र ठरल्या आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड आणि जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली प्रधानमंत्री मातृ योजना प्रभावीपणे राबविली जात आहे. प्राथमिक आरोग्य केंद्राच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना या योजनेची माहिती देऊन त्यांना लाभ मिळवून दिला जात आहे. गेल्या चार वर्षात जिल्ह्यातील ग्रामीण भागातील २३,३४० आणि शहरी भागातील २६,५५७ लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ देण्यात आला आहे.
मातृ वंदना सप्ताहाचा लाभ देण्यासाठी आरोग्यसेवक, आशा, अंगणवाडी सेविका घरोघर जाऊन कागदपत्रे गोळा करीत आहेत.
तीन टप्प्यात मिळणार पैसे
गर्भधारणा नोंदणी केल्यानंतर १ हजार रुपयांचा पहिला हप्ता मिळतो. प्रसूतिपूर्व किमान एकदा तपासणी केल्यास गर्भधारणेच्या सहा महिन्यांनंतर दुसरा हप्ता २ हजार रुपये जमा होतात.
प्रसूतीनंतर झालेल्या अपत्याची जन्मनोंदणी व बालकाचे प्राथमिक लसीकरण पूर्ण केल्यावर लाभार्थी महिलेच्या खात्यावर २ हजार रुपयांचा तिसरा हप्ता जमा केला जातो.
पात्रतेचे निकष काय...
- शासकीय सेवेत असणाऱ्या महिलांना वगळता समाजातील सर्व महिला या योजनेचा लाभ घेऊ शकतात.
- पहिल्या अपत्यासाठी गरोदर असणाऱ्या सर्व पात्र गर्भवती महिला आणि स्तनदा माता या योजनेसाठी पात्र असतील. पहिल्या जीवित अपत्यापुरताच या योजनेचा लाभ घेता येतो.
लाभासाठी कोठे करायचा संपर्क...
- योजनेचा लाभ घेण्यासाठी आरोग्य सेविका, आशा, अंगणवाडी सेविका किंवा शासकीय आरोग्य केंद्रामध्ये संपर्क साधता येतो.
- लाभार्थी व तिच्या पतीचे आधारकार्ड, लाभार्थीचे आधारकार्डशी जोडलेले बँक खाते आवश्यक आहे.
- गरोदरपणाची नोंदणी शासकीय आरोग्य संस्थेत १०० दिवसांच्या आत, तसेच बाळाची जन्मनोंदणी दाखल व प्राथमिक लसीकरण नोंदणी केल्यावर योजनेचा पूर्ण लाभ घेता येतो.
मातृवंदना योजना केंद्र सरकारतर्फे राबविली जाते. ही योजना शहरी तसेच ग्रामीण भागातही राबविण्यात येत आहे. त्यानुसार १ जानेवारी २०१७ किंवा त्यानंतर पहिल्यांदा ज्या मातांची प्रसूती झाली असेल, अशा मातांना या योजनेचा लाभ दिला जातो. गेल्या ४ वर्षात ग्रामीण भागात २३,३४० मातांना ९ कोटी ९४ लाख ३ हजार, तर शहरी भागात २६,४५७ मातांना ११ कोटी २६ लाख ५४ हजार, इतका लाभ देण्यात आला आहे.
रत्नागिरी जिल्हा परिषदेतर्फे १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत मातृ वंदना योजना सप्ताह राबविला जात आहे. ही योजना अधिकाधिक लाभार्थ्यांपर्यंत नेण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी डाॅ. इंदुराणी जाखड, जिल्हा आरोग्य अधिकारी डाॅ. अनिरुद्ध आठल्ये यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवीण डुब्बेवार प्रयत्न करीत आहेत. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विक्रांत जाधव, आरोग्य सभापती उदय बने यांचे सहकार्य लाभत आहे.
लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळावा, यासाठी १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत मातृ वंदना विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. त्यासाठी आरोग्य सेविका, आशा, अंगणवाडी सेविका यांच्यामार्फत लाभार्थ्यांच्या घरी जाऊन त्यांची कागदपत्रे गोळा करण्यात येत आहेत. प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण आरोग्य केंद्रे याठिकाणी माहितीपत्रके ठेवण्यात आली आहेत. या योजनेचा लाभ घ्यावा.
- डाॅ. इंदुराणी जाखड, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, रत्नागिरी