रत्नागिरी : बोगदा बांधकाम आणि राष्ट्रीय महामार्ग प्रकल्पांच्या उतार स्थिरीकरणाशी संबंधित डिझाइन, रेखाचित्र आणि सुरक्षितता पैलूंचा आढावा घेण्यासाठी कोकण रेल्वे आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात सामंजस्य करार करण्यात आला आहे. कोकण रेल्वेचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता आणि राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अध्यक्ष संतोष कुमार यादव यांनी, तसेच या दोन्ही विभागांचे वरिष्ठ अधिकारी यांच्या उपस्थितीत स्वाक्षऱ्या करण्यात आल्या.कोकण रेल्वे आणि भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांनी एका सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. याअंतर्गत कोकण रेल्वे आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विविध कामांत विविध स्तरांवर सहकार्य करणार आहे. अत्यंत दुर्गम भागात कठीण स्थितीत बोगदे व मार्ग उभारणीची अनेक कामे कोकण रेल्वेने यापूर्वी यशस्वी केली आहेत. कोकण रेल्वेचा हाच अनुभव लक्षात घेता बोगदा बांधकामात अत्यंत सुरक्षितता आणि कार्यक्षमता सुनिश्चित करण्याच्या दिशेने भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)ने कोकण रेल्वे कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत सामंजस्य करार (एमओयू) केला आहे.या कराराअंतर्गत, कोकण रेल्वे भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या प्रकल्पांना सेवा प्रदान करेल, ज्यामध्ये बोगदा बांधकाम आणि उतार स्थिरीकरणाशी संबंधित डिझाइन, रेखाचित्र आणि सुरक्षा पैलूंचा सर्वसमावेशक आढावा समाविष्ट आहे. कोकण रेल्वेच्या बोगद्यांचे सुरक्षा ऑडिट देखील करेल आणि आवश्यक असल्यास, उपचारात्मक उपाय सुचवेल. याव्यतिरिक्त कोकण रेल्वे आता भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या अधिकाऱ्यांच्या क्षमता वाढीसाठी प्रशिक्षण कार्यक्रम करेल. हा करार दोन वर्षांच्या कालावधीसाठी लागू राहील.
कोकण रेल्वे-राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्यात सामंजस्य करार
By शोभना कांबळे | Published: November 24, 2023 4:08 PM