चिपळूण : आठवडाभरापासून कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे दसपटी भागातील नांदिवसे-राधानगर परिसरातील डोंगरामध्ये जमिनीला भेगा पडल्याचे शुक्रवारी (३० जून) सकाळी समाेर आले. या भागात १६ कुटुंबे राहत असून, यासंदर्भात युवासेना पदाधिकाऱ्यांनी याबाबत प्रशासनाकडे संपर्क साधून माहिती दिली. त्यानंतर खबरदारीचा उपाय म्हणून या कुटुंबांना घरे खाली करून सुरक्षितस्थळी जाण्याच्या सूचना स्थानिक प्रशासनाने दिल्या आहेत.तालुक्यातील दसपटी विभागातील नांदिवसे-राधानगर येथे डोंगराला भेगा गेल्याची माहिती चिपळूण युवासेना तालुका सचिव अनिकेत शिंदे यांना ग्रामस्थांनी दिली. त्यानंतर युवासेनेचे तालुकाप्रमुख निहार कोवळे यांच्यासह शहर उपप्रमुख शुभम कदम, अमेय चितळे, ओंकार नलावडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. त्यांनी याबाबतची माहिती येथील प्रांत कार्यालयात अधिकाऱ्यांना दिली. यावेळी प्रशासनाने तेथून जवळच राहत असलेल्या कुटुंबांना स्थलांतर करण्याच्या सूचना दिल्या.दोन वर्षांपूर्वी २२ जुलै २०२१ च्या अतिवृष्टीतही या भागात डोंगराला भेगा गेल्या होत्या. त्यामुळे या भेगा आता रुंदावल्यात की नव्याने पुन्हा पडल्या आहेत, याचा शोध घेण्याचे काम सुरू आहे. यासंदर्भात तहसीलदार प्रवीण लोकरे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी मंडल अधिकाऱ्यांना घटनास्थळी पाहणी करण्याकरिता पाठविल्याची माहिती दिली. या घटनेच्या पार्श्वभूमीवर चिपळूण युवा सेना आपत्ती व्यवस्थापनासाठी पुन्हा एकदा सक्रिय झाली आहे. पूरपरिस्थिती मदतीसाठी आपत्ती व्यवस्थापन पथक सज्ज झाले आहे. भूस्खलनासाठीही टीम बनवली जात असल्याचे युवा सेना तालुकाप्रमुख कोवळे यांनी सांगितले.
विक्रमी १०९ मिमी पाऊसआठवडाभर कोसळत असलेल्या मुसळधार पावसाचा जोर शुक्रवारीही दिवसभर कायम होता. गेल्या २४ तासांत येथे १०९ मिमी इतकी पावसाची नोंद झाली आहे. यावर्षीचा पाऊस सुरू झाल्यापासून आतापर्यंतची पावसाची ही विक्रमी नोंद आहे. जून महिन्यात एकूण पाऊस ४३७ मिमी इतका झाला आहे.