दापोली : तालुक्यातील देवाचा डोंगर येथील उपलब्ध पाण्याचा स्रोत पूर्णपणे आटल्याने ग्रामस्थांना फेब्रुवारीपासूनच पाणीटंचाईची झळ बसू लागली आहे. सद्यस्थितीत दक्षिण टोकावरील उपलब्ध पाण्यावर तहान भागवताना ३ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे. फेबुवारी महिन्यात ही परिस्थिती असेल, तर एप्रिल व मे महिन्यात ग्रामस्थांचे काय हाल होतील, या विचाराने सर्वांची झोप उडाली आहे.दापोलीतील देवाचा डोंगर हा अतिदुर्गम भाग पालगड जिल्हा परिषद गटात येतो. देवाच्या डोंगरावरील सर्व धनगरवाड्यांमध्ये जानेवारी महिना उजाडण्यापूर्वीच पाणी टंचाईची समस्या जाणवू लागली आहे. श्री विठ्ठल - रखुमाई मंदिरानजीक असलेल्या डुऱ्यातील पाणी पिऊन ग्रामस्थ तहान भागवावी लागत आहे. मात्र, या डुऱ्यातील पाणी आटत चालल्याने ग्रामस्थांना पाणीटंचाईची चाहुल लागली आहे. जवळपास पाण्याचे कुठलेच जलस्रोत उपलब्ध नसल्याने ३ किलोमीटरची पायपीट करून ग्रामस्थांची आतापासूनच दाहीदिशा सुरू झाली आहे. देवाच्या डोंगरावर एकूण १५० कुटुंब वास्तव्यास आहेत. लोकसंख्या ८०० आहे. ऐन उन्हाळ्यात कोणत्याही कार्यक्रमप्रसंगी पाचशे लीटरचे बरल पाणी आणण्यासाठी ५०० रूपये मोजावे लागतात. येथील लोकांना पिण्यासाठी पाणी नसल्याने त्यांना जगण्याकरिता तारेवरील कसरत करावी लागत आहे. शासनाकडून नळपाणी योजना कार्यान्वित करण्यात यावी, करून येथील लोकांचे विस्कळीत झालेले जीवन सुरळीत होईल, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. पावसाळ्यात तुडूंब भरणाऱ्या नद्या. नाले, विहिरी मार्च महिना सुरू झाली की कोरड्या व्हायला लागतात. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन देवाचा डोंगर येथील धनगर वाड्यावरती नवीन सार्वजनिक विहिरी बांधून पाणी प्रश्न सोडवण्याची मागणी येथील ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)पाण्यासाठी दाहीदिशा : हंडाभर पाण्यासाठी तारेवरची कसरतसध्या तीन किमीची पायपीट केल्यानंतर एखाद्या खोल विहिरीच्या तळाला असलेले पाणी छोट्याशा भांड्याने काढून ते मोठ्या हंड्यात भरावे लागत आहे. पंधरा ते वीस मिनिटांनंतर एखादे भांडे भरून पाणी मिळत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आतापासूनच पाण्यासाठी दीर्घ पायपीट करावी लागत आहे.रत्नागिरी व रायगड हे दोन जिल्हे आणि चार तालुके यामध्ये सामावलेल्या या देवाच्या डोंगराचा गंभीर प्रश्न हा लवकरात लवकर कसा सोडविता येईल, याकडे शासनाने जास्तीत जास्त लक्ष दिले पाहिजे.
देवाचा डोंगर तहानला
By admin | Published: February 18, 2016 12:08 AM