रत्नागिरी : पुणे विद्यापीठ व गिरीभ्रमण संस्थेतर्फे गिर्यारोहण विषयी पदविका प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. मुलांमध्ये पर्यावरण जतनाची जाणीव लहानपणापासून रूजली, तर भविष्यात निसर्गावरील अत्याचार कमी होण्यास मदत होईल. शिवाय गिर्यारोहण अभ्यासक्रमानंतर व्यवसाय, रोजगाराची संधी उपलब्ध असल्याने गिर्यारोहण विषयाचा समावेश अभ्यासक्रमात व्हावा, असे प्रतिपादन ज्येष्ठ गिर्यारोहक उष:प्रभा पागे यांनी केले.उमटलेली पाऊले पुस्तक प्रकाशन सोहळ्यानिमित्त उष:प्रभा पागे रत्नागिरीत आल्या असता, त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. पर्यावरण संवर्धनासाठी लोकसहभागाची आवश्यकता आहे. जिल्ह्यातील सडे, तेथे असणारी जैवविविधता याची नोंद ग्रामपंचायतस्तरावर होणे गरजेचे आहे. सडे, पर्वत, समुद्र, नद्या, खाड्या, खाजण व तेथे वाढणारी खारफुटी यांचे जतन व संवर्धन होणे गरजेचे आहे. याबाबत अभ्यासकांनी लेखन करणे आवश्यक असून, सहली काढून त्याबाबतची माहिती लोकांपर्यत पोहोचविणे गरजेचे असल्याचे पागे यांनी सांगितले.कोकणातील भूभाग वैशिष्ट्यपूर्ण आहे. पावस येथील सड्यांवर दुर्मीळ जातीच्या स्थळविशिष्ट वनस्पती आहेत. त्याबाबत पूर्वी कोणी अभ्यास केला आहे का? किंवा याबाबत काही नोंद आहे का? सद्यस्थितीत त्या वनस्पती आहेत का? याबाबत संशोधन होणे गरजेचे आहे. महाविद्यालयातून विद्यार्थ्यांना प्रोजेक्ट वर्क म्हणून निसर्गात जाऊन जैवविविधतेची माहिती देणे गरजेचे आहे.
मुलांमध्ये स्वालंबनाबरोबर निसर्गाचे भान व अन्य विविध गोष्टींचे ज्ञान देणे गरजेचे आहे. व्यक्तीमत्व विकासाचे भाग गिर्यारोहणव्दारे शिकविता येतात. यामुळे मुलांमध्ये खूप परिणाम होतो. अभ्यासक्रमात या विषयाचा समावेश होणे गरजेचे असल्याचे पागे यांनी सांगितले.