लोकमत न्यूज नेटवर्क
देवरुख : संगमेश्वर तालुक्यात १९६ गावांपैकी ३० गावांमध्ये विलगीकरण कक्ष निर्माण करण्याच्या हालचाली सुरू झाल्या असून, त्यांची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
संगमेश्वर तालुक्यात १९६ महसुली गावे, तर १२६ ग्रामपंचायती आहेत. यात ६६ पेक्षा अधिक गावे २००० लोकसंख्या असलेली आहेत. २०११ च्या जनगणनेनुसार केवळ १८ गावेच २००० किंवा त्यापेक्षा लोकसंख्येची आहेत. मात्र आरोग्य विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार ६६ गावे या लोकसंख्येच्या वर आहेत.
तालुक्यातील बुरंबी, ताम्हाणे, निवे, कुरुधुंडा या गावांनी आपल्या परिसरातील तीन अथवा पाचपेक्षा अधिक गावांनी एकत्र येत स्वेच्छेने याचे नियोजन केले आहे. २ जूनला हा आदेश देण्यात आल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे ३ जून रोजी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी तालुक्यातील दादासाहेब सरफरे विद्यालयासह अनेक ठिकाणी भेट दिली. यावेळी त्यांच्यासोबत तहसीलदार सुहास थोरात, गटविकास अधिकारी नरेंद्र रेवंडकर होते. तालुक्यात या पाच विलगीकरण केंद्रांबरोबरच कोळंबे, आंबेड बु., माभळे, नावडी, डिंगणी, मुचरी, निवे बुद्रुक, देवळे, कोसुंब, मोर्डे, तुळसणी, करजुवे, माखजन, हातीव, बुरंबाड, ओझरे खुर्द, आरवली, कळंबस्त, तुरळ, कोंडगाव, साडवली, कसबा, दाभोळे, धामापूर तर्फ संगमेश्वर आणि कडवई येथे कक्ष उभारणीच्या कामाला गती देण्यात आली आहे. यात अजून वाढ होण्याची शक्यता आहे.
.........................
जास्तीत जास्त गावांत विलगीकरण कक्ष निर्माण झाल्यामुळे गावातच त्यांची सोय होऊ शकेल. यामुळे कोरोना संसर्ग रोखण्यासाठी असे गावात निर्माण होणारे कक्ष महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
- संदेश ऊर्फ बापू शेट्ये, सरपंच, कोंडगाव
......................................
कोरोनामुळे पॉझिटिव्ह रुग्णाची मानसिकता ढासळते. असे रुग्ण मनाने खचून जातात. त्यांना आपल्या परिसरातील ओळखीच्या ठिकाणी विलगीकरण कक्षात ठेवल्यास त्यांना सोयीचे ठरणार आहे. शिवाय गावातच असल्याने आपल्या कुटुंबापासून जवळ असल्याची भावना त्यांच्या मनात राहील. त्याचा ते बरे होण्यावर चांगला परिणाम होईल. त्यामुळे अशी केंद्रे महत्त्वाची भूमिका निभावणार आहेत. कोसुंब गावातील विलगीकरण कक्ष सहा गावे मिळून एकत्र करणार आहेत.
पूजा बोथरे, सरपंच, कोसुंब