सावंतवाडी : राज्यातील मुस्लिमांना देण्यात आलेले घटनाबाह्य आरक्षण, चीनचा भारतविरोधी नकाशा व हिंदू संतांची अपकीर्ती याच्या विरोधात आज रविवारी राष्ट्रीय हिंदू आंदोलन व हिंदू जनजागृती समितीच्यावतीने येथील गांधी चौक येथे धरणे आंदोलन करण्यात आले. यावेळी एकनाथ सावंत, विराज निकम, शंकर राऊळ, चंद्रकांत बिले, बाळकृष्ण राऊत, संदीप सावंत, दिनेश रेडकर, संदीप नाणोसकर, जीवन केसरकर, सुप्रिया चव्हाण, संगीता सावंत, पल्लवी पेडणेकर, भाग्यश्री सावंत आदी उपस्थित होते. महाराष्ट्रात काँग्रेस आघाडी शासनाने निवडणुकांना समोर करून मुस्लिम मतपेटीसाठी लागू आरक्षणाला विरोध, भारताचा अविभाज्य भाग असलेला अरुणाचल प्रदेश आणि काश्मीरचा भाग आपला प्रदेश असल्याचा विकृत नकाशा प्रसिद्ध करणाऱ्या चीनला धडा शिकविण्यासाठी त्यांच्या उत्पादनांवर भारतीयांनी बहिष्कार टाकावा आणि हिंदू संंतांची अपकीर्ती करून हिंदू समाजापासून त्यांना तोडण्याचे षड्यंत्र आखणाऱ्यांवर कारवाई करावी, या मागण्यांसाठी सर्व हिंदुत्ववादी संघटनांनी एकत्रितपणे राष्ट्रीय हिंदू आंदोलन समितीच्यावतीने गांधी चौक येथे सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास आंदोलन केले. शासनाने मुस्लिमांना पाच टक्के आरक्षण दिले असले, तरी वास्तविक कोणासही धर्माच्या आधारावर आरक्षण देता येत नाही, असे घटनेतील कलमाध्ये नमूद केले आहे. हा निर्णय घटनेच्या तरतुदीवर घाला घालणारा असल्याने आणि सर्वोच्च न्यायालयाचा अवमान करणारा असल्याने तो रहीत करण्यात यावा, असेही स्पष्ट करण्यात आले होते. तसेच अमरनाथ यात्रेला सुरक्षा पुरविण्याची मागणीही करण्यात आली.बालताल या मार्गे १८ जुलै रोजी अमरनाथ दिशेने मार्गक्रमण करणाऱ्या यात्रेकरूंवर धर्मांधांनी केलेल्या आक्रमणात चोवीस जण घायाळ झाले आहेत. यावेळी धर्मांधांनी जाळपोळ आणि दगडफेक करीत यात्रेकरूंसाठी उभारलेल्या तंबूंचीही नासधूस केली होती. या आक्रमणामुळे बालतालमार्गे जाणारी यात्राही स्थगित करण्यात आली होती. हिंदूंच्या यात्रा बंद पाडण्याचे जाणीवपूर्वक केलेले हे षड्यंत्र आहे. त्यामुळे अमरनाथ यात्रा सुस्थितीत पार पाडण्यासाठी यात्रेकरूंना तत्काळ सुरक्षा पुरविण्यात यावी आणि यात्रा बंद पाडण्याचे षड्यंत्र करणाऱ्यांवर तत्काळ कठोर कारवाई करण्यात यावी. भारताचा अविभाज्य भाग असलेल्या अरुणाचल प्रदेश आणि काश्मीरचा काही भाग आपला असल्याचे दर्शविणारा विकृत नकाशा प्रसिद्ध करणाऱ्या चीनला धडा शिकविण्यासाठी त्यांच्या उत्पादनांवर भारतीयांनी बहिष्कार टाकावा, श्रीनगर येथे निदर्शनांच्यावेळी इराकमधील आयएसआयएस या आतंकवादी संघटनेचा ध्वज फडकविणाऱ्या देशद्रोह्यांंवर कारवाई करावी, या मागण्यांसाठी आंदोलन करण्यात आले. (वार्ताहर)
विविध मागण्यांकरिता हिंदू संघटनांचे आंदोलन
By admin | Published: July 20, 2014 9:51 PM