दापोली : राज्यातील इतर विद्यापीठातील कर्मचाऱ्यांप्रमाणे कृषी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी दापोली कोकण कृषी विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन केले.राज्यातील चारही कृषी विद्यापीठांचे अधिकारी आणि कर्मचारी सध्या सातव्या वेतन आयोगाच्या लाभासाठी आंदोलन करीत आहेत. दिनांक 20 ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या या आंदोलनात राज्यातील चारही विद्यापीठाच्या सर्व कर्मचारी संघटना सहभागी झाल्या आहेत. लेखी स्वरूपाची निवेदने आणि काळ्या फिती लावून सुरू झालेल्या या आंदोलनाच्या पहिल्या टप्प्यानंतर आता दुसऱ्या टप्प्यातील आंदोलन सुरू झाले आहे.
यामध्ये लेखणी बंद आंदोलन केले जात असून, आपल्या न्याय्य मागण्या मान्य झाल्या नाहीत, तर १०० टक्के काम बंद आंदोलन केले जाण्याचा इशाराही यावेळी कर्मचाऱ्यांकडून दिला जात आहे. दापोलीच्या डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कर्मचारी या आंदोलनात सहभागी झाले असून, आपल्या कार्यालयात बसून ते लेखणी बंद आंदोलन करीत आहेत. यामुळे विद्यापीठातील कामकाज ठप्प झाले आहे.सातवा वेतन आयोग लागू करावा, ही मागणी करत राज्यभरातील कृषी विद्यापीठातील सर्व कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचे हत्यार उपसले आहे. सोमवारपासून चारही कृषी विद्यापीठात कामबंद आंदोलन पुकारले आहे. राज्य सरकारने मागणी मान्य केली नाही तर बेमुदत काम बंदचा इशारा देण्यात आला आहे.