लांजा : तालुक्यात दिवसेंदिवस कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता कोरोनाबाधित रुग्णांवर वेळेवर उपचार व्हावा यासाठी लांजा शहरात काेविड सेंटर उभारण्याच्या हालचाली सुरू आहेत. कुक्कुटपालन येथील शेड तसेच अल-मिन उर्दू हायस्कूल कोविड सेंटर उभारण्याच्या दृष्टीने उच्च व शिक्षणमंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांनी इमारतींच्या जागेची पाहणी केली.
तालुक्यात गावागावातील ग्रामीण भागात मोठ्या संख्येने कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. सध्या रुग्णांना बेड कमी पडू नयेत तसेच ऑक्सिजन बेड रुग्णांना मिळण्याच्या दृष्टीने लांजा येथील शासकीय विश्रामगृह येथे मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी यांनी आढावा बैठक घेतली. या बैठकीला लांजा प्रांताधिकारी पोपट ओमासे, नायब तहसीलदार उज्ज्वला केळुस्कर, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मारुती कोरे, लांजा ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश पाटील, नगरपंचायतीचे मुख्य अधिकारी तुषार बाबर, नगराध्यक्ष मनोहर बाईत, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विलास चाळके, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजापकर, तालुकाप्रमुख संदीप दळवी, कुक्कुटपालन संस्थेचे चेअरमन विवेक सावंत, प्रसाद शेट्ये तसेच बांधकाम विभागाचे अधिकारी आदींसमवेत बैठक घेऊन आढावा घेतला. कोरोना रुग्णांची हेळसांड होऊ नये यासाठी बेड वाढवण्यासाठी आरोग्य विभागाला सूचना करण्यात आल्याण तसेच कुक्कुटपालन पालन येथील असलेल्या शेड व शहरातील अल-मिन उर्दू हायस्कूल येथील पाहणी केली आहे. तसेच लवकरात लवकर जागा निश्चित करून सुसज्ज कोविड सेंटर निर्माण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.