देवरुख : संगमेश्वर तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे दख्खन, मुर्शी येथे मोठ्या प्रमाणात दरडी कोसळल्या होत्या. यामुळे दख्खन येथील कमलाकर माईन, मुर्शी येथील गाडे, तर भेंडीचा माळ येथील घरांवर दरड कोसळून नुकसान झाले होते. खासदार विनायक राऊत यांनी येथील परिस्थितीची पाहणी केली. ग्रामस्थांच्या व्यथा जाणून घेत त्यांना दिलासा दिला.
प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना राऊत यांनी दिल्या आहेत. खासदार राऊत यांनी ज्या घरांचे नुकसान झाले आहे, त्यांची पाहणी केली. त्या कुटुंबांना धीर दिला. सरकार पूर्णपणे तुमच्या पाठीशी असून, लवकरच भरपाई मिळेल. स्थलांतरित केलेल्या ग्रामस्थांना पूर्णपणे मोफत धान्य मिळेल, असेही त्यांनी सांगितले. सर्व पंचनामे पूर्ण झाले का, याची माहिती त्यांनी शासकीय अधिकाऱ्यांकडून घेतली.
या दौऱ्यामध्ये खासदार विनायक राऊत यांच्यासमवेत आमदार राजन साळवी, जिल्हाप्रमुख विलास चाळके, संपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक, उपजिल्हाप्रमुख जगदीश राजपकर, माजी आमदार सुभाष बने, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष रोहन बने, जिल्हा परिषद सदस्य रजनी चिंगळे, युवा सेना जिल्हाप्रमुख विनय गांगण, काका कोलते, अजय सावंत, प्रवीण जोयशी, शेखर आकटे, विनायक गोवरे, केतन दुधाणे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
संगमेश्वर तालुका हा डोंगराळ भाग आहे. बहुतांश नद्यांचा उगम या तालुक्यातून होत आहे. त्यामुळे अतिवृष्टी काळात डोंगर खचणे, नद्यांना पूर येणे असे प्रकार घडतात. याचा विचार करून यंत्रणेने सर्व डोंगराळ भागांचे सर्वेक्षण करावे. जे भाग धोकादायक आहेत, अशा ठिकाणच्या ग्रामस्थांना सुरक्षितस्थळी स्थलांतरित करावे. तसेच नद्यांमधील गाळ उपसा करण्यावर भर द्यावा, अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या. यावेळी कासारकोळण, निवधे, बामणोली, खडीकोळवण, ओझरे गुरववाडी या भागांना त्यांनी भेट दिली. यावेळी ग्रामस्थांनी आपल्या मागण्यांचे निवेदन त्यांना दिले.