रत्नागिरी : शासकीय नियमावलीचे पालन करून भैरीबुवाचा शिमगोत्सव साजरा केला जाणार आहे. ग्रामप्रदक्षिणा व सहाणेवर पालखी कोठेही खेळविण्याचा कार्यक्रम होणार नसल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष रवींद्र ऊर्फ मुन्ना सुर्वे यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेमध्ये दिली.
ग्रामदैवत श्रीदेव भैरीची पालखी बारा वाड्यांमध्ये रथामधून ग्रामप्रदक्षिणा करणार आहे. मात्र, ज्या ठिकाणी रथ जाऊ शकणार नाही, तेथे पालखी खांद्यावरून नेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. पौर्णिमेच्या दिवशी सकाळी दहा ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत भैरी मंदिर दर्शनासाठी खुले राहणार आहे. मात्र, त्यानंतर कोणालाही मंदिरात प्रवेश दिला जाणार नाही. देवळाच्या बाहेर बॅरिकेडस् लावली जाणार आहेत. जाकिमिऱ्या व सडामिऱ्या येथील पालख्या या देवळात भेटणार नाहीत. मात्र, भैरी मंदिरात त्यांच्या सोयीनुसार देवाची भेट घेऊ शकतात. तसेच रात्री बारा वाजता मंदिरातून दरवर्षीप्रमाणे भैरीची पालखी बाहेर पडणार आहे.
भैरीच्या पालखीच्या नगर प्रदर्शनाच्या वेळी उलपे स्वीकारले जाणार नाहीत. पौर्णिमा ते धूलिवंदन या कालावधीत सहाणेवर ओटी भरता येणार आहे. सहाणेवर पालखी बसल्यानंतर ठराविक अंतर ठेवून उलपे घेण्यात येणार आहेत. शिमगोत्सवापूर्वी दोन दिवस अगोदर बारा वाड्यांत रिक्षा फिरवून याची कल्पना भाविकांना देण्यात येणार आहे. यावर्षी होळीची उंची कमी ठेवण्यात येणार आहे. ठराविक लोकांच्या उपस्थितीत झाडगाव येथील सहाणेवर होळी उभी केली जाणार आहे.
भैरीच्या भेटीसाठी गावागावांतून पालख्या येतात. पालखीसाेबत माेजकीच मंडळी ठेवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. त्यानुसार माेजकीच मंडळी या पालखीसाेबत राहणार असल्याचे सुर्वेे यांनी सांगितले. पत्रकार परिषदेसाठी दिनेश सावंत, अंकुश शिवलकर, दीपक कीर, राजन जोशी, प्रकाश पिलणकर, विकास मयेकर, प्रकाश घुडे, राजन फगरे, जितू भोंगले, बाळकृष्ण शिवलकर उपस्थित होते.