चिपळूण : चिपळुणात पूर परिस्थिती ओसरल्यानंतर चिखलासह सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. प्रामुख्याने सार्वजनिक ठिकाणी व रस्त्यावर आलेला चिखल व घाणीचे साम्राज्य दूर करण्यासाठी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे श्री सदस्य जोमाने मदतकार्यात उतरले आहेत.
रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील सुमारे ६,६०० सदस्य रस्त्यावर स्वच्छता अभियानाचे काम विधायकरीत्या करू लागले आहेत. दोन्ही जिल्ह्यांतील हे सदस्य येथे स्वखर्चाने आले असून, जेवणाची व्यवस्थाही त्यांनी स्वतः केली आहे. नेहमी संकटकाळात पुढाकार घेणाऱ्या श्री सदस्यांनी पूरग्रस्तांच्या मदतीला धावून जात त्यांनी सामाजिक बांधिलकी कायम ठेवली आहे.
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी जिल्ह्यासह मुंबई, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर येथून मदतीचा ओघ सुरूच आहे. दरम्यान, महापुरामुळे तळमजल्यासह रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल माती आणि पुरातून वाहून आलेल्या साहित्याचे साम्राज्य पसरले आहे. घरातील चिखल काढण्यात बाधित पूरग्रस्त गुंतले आहेत. मात्र, रस्त्यासह सार्वजनिक ठिकाणी पडलेली घाण दूर करण्यात शासकीय यंत्रणा पुरेशी ठरलेली नाही. त्यामुळे नेहमी सामाजिक बांधिलकी जोपासणारे डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान रेवदंडाचे श्री सदस्य डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या दोन दिवसांपासून स्वच्छता अभियानात गुंतले आहेत.
रस्त्यावर आलेला चिखल आणि घाण उचलली जात असल्याने काही प्रमाणात रोगराईला आळा बसण्यास मदत झाली आहे. अद्यापही रस्ते, घर आणि दुकानांमध्ये मोठ्या प्रमाणात चिखल आहे. वीजपुरवठा खंडित असल्याने दुकाने व घरातील चिखल काढण्यात अडचणी येत आहेत. याही स्थितीत सार्वजनिक ठिकाणी रस्ते, पायवाटा येथील चिखल आणि रस्त्यावर आलेली घाण दूर करून पूरग्रस्तांना दिलासा देण्याचे काम श्री सदस्यांनी सुरूच ठेवले आहे.
-------------------------
तीन ठिकाणी स्वच्छता माेहीम
चिपळूण येथील मदतकार्यात रोहा येथून १००, राजापुरातून २००, अलिबाग १२५, लांजावरून २५, सांगलीवरून २५ आणि चिपळूण तालुक्यातील सुमारे १०० हून अधिक श्री सदस्य या स्वच्छता अभियानात सहभागी झाले आहेत. निघालेला चिखल आणि विविध साहित्य संकलित करून ते दोन जेसीपी आणि दोन डंपरच्या साहाय्याने योग्य ठिकाणी टाकले जात आहे. चिपळूण, खेर्डी, त्याचबरोबर कळंबस्ते येथे हे सदस्य दिवसभर स्वच्छतेसाठी मेहनत घेत आहेत.