दापोली : उद्धव साहेब तुम्ही पंधरा दिवसांत एलईडी मासेमारीच्या बोटी अरबी समुद्रात बुडविणार होतात. आपण दिलेल्या वचनाला आता दोन वर्षं पूर्ण होतील, परंतु एलईडी मासेमारी अजूनही राजरोसपणे सुरू आहे. त्यामुळे आपण दिलेल्या वचनाचा आपल्याला विसर तर पडला नाही ना, असा प्रश्न हर्णै बंदर कमिटीचे कार्याध्यक्ष बाळकृष्ण पावसे यांनी केला आहे.
बेकायदेशीर एलईडी मासेमारीविरोधात पारंपरिक मच्छीमारांनी साखळी उपोषण सुरू केले आहे. सलग तिसऱ्या दिवशीही या आंदोलनाला मच्छीमार बांधवांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. लोकसभा निवडणुकीदरम्यान उद्धव ठाकरे हे अनंत गिते यांच्या प्रचारासाठी गुहागर येथे आले होते. त्याच वेळेस जाहीर सभेत त्यांनी कोकणातील पारंपरिक मच्छीमारांना एलईडी मासेमारी पंधरा दिवसांत अरबी समुद्रात बुडवण्याचे वचन दिले होते. कोकणातील पारंपरिक मच्छीमार समाज आजही शिवसेनेच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे. तुमचा मावळा असलेला हा पारंपरिक मच्छीमार समाज संकटात सापडला आहे, त्यांना तुम्ही कधी मदत करणार व एलईडी बंद करण्यासाठीचा कायदा अंमलात कधी आणणार, असा प्रश्न पावसे यांनी केला आहे.
कोकणातील सर्वच जिल्ह्यांमध्ये पारंपरिक मच्छीमार बांधवांकडून साखळी उपोषण सुरू आहे. योग्यवेळी आमच्या उपोषणाची दखल न घेतल्यास आम्हालासुद्धा वेगळा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही पावसे यांनी दिला आहे.