पाली : महामार्गावर अपघात झाल्यानंतर जखमींवर त्वरित प्राथमिक उपचार व्हावेत, यासाठी महामार्गालगत असलेल्या गावातील निवडक व्यक्तींना प्रशिक्षण देऊन त्यांची महामार्ग मृत्युंजय देवदूत म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. अशा १०० देवदूतांना महामार्ग पोलिसांकडून प्रशिक्षण देण्यात आले असून, नुकतीच त्यांना वैद्यकीय साहित्याचेही वाटप करण्यात आले.
यावेळी महामार्ग रत्नागिरी विभागाच्या प्रभारी पोलीस निरीक्षक रेश्मा कुंभार, हातखंबा महामार्ग सहायक पोलीस निरीक्षक अमर पाटील, डेरवण वालावलकर रुग्णालयाचे प्रशासकीय अधिकारी प्रफुल्ल गोडबोले, सहायक पोलीस उपनिरीक्षक संतोष सावंत, सचिन घाग यांच्यासह सर्व वाहतूक पोलीस कर्मचारी प्रातिनिधिक स्वरूपात मृत्युंजय देवदूत उपस्थित होते.
महामार्ग पोलीस विभागाचे पोलीस महासंचालक डॉ.भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे. त्यानुसार, मार्चमध्ये १०० व्यक्तींना परिपूर्ण प्रशिक्षण डेरवण रुग्णालयात दिले आहे. विठ्ठलराव जोशी ट्रस्ट संचलित डेरवण रुग्णालयाने १० स्ट्रेचर व अल्ट्राटेक सिमेंट कंपनी रत्नागिरी यांनी मृत्युंजय पथकासाठी प्रथमोपचाराचे साहित्य विनामूल्य उपलब्ध करून दिले आहेत. ही पथके साखरपा, ओणी, राजापूर, लांजा या ठिकाणी नेमण्यात आली आहे.
......................................
महामार्ग वाहतूक पोलीस मदत केंद्र हातखंबा येथे मृत्युंजय दूत पथकाला पोलिसांनी साहित्य वाटप केले.