लाेकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : थकीत वीजबिलांची वसुली करताना कठाेर पावले उचलणाऱ्या महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीही जपण्याचे काम केले आहे. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने पैसे जमा करून त्यातून विशेष मुलांसाठी कार्यरत असलेल्या येथील आशादीप संस्थेला लाेखंडी कपाट भेट स्वरूपात दिले आहे. या मदतीमुळे आशादीप संस्थेची हाेणारी गैरसाेय दूर हाेण्यास मदत झाली आहे.
रत्नागिरी येथे विशेष मुलांची कार्यशाळा ‘आशादीप’ कार्यरत असून, त्यांचे काम अजोड आहे. या संस्थेला लोखंडी कपाट आवश्यक असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर रत्नागिरी ग्रामीण उपविभागातील उपकार्यकारी अभियंता ओंकार डांगे यांनी याबाबत कार्यालयातील अधिकारी आणि कर्मचारी यांना माहिती दिली. सर्वांनी स्वयंस्फूर्तीने वैयक्तिक पातळीवर वर्गणी गोळा केली. या पैशातून एक लोखंडी कपाट आशादीप संस्थेला कार्यकारी अभियंता रामलिंग बेले यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. या वेळी बेले यांनी आशादीप संस्थेच्या कामाची पाहणी करून त्यांचे कौतुक केले. तसेच भविष्यातही संस्थेला मदत करू, असेही आश्वासन दिले.
या वेळी ग्रामीणचे उपकार्यकारी अभियंता ओंकार डांगे, चाफे येथील उपकार्यकारी अभियंता मंगेश पाटील आदी कर्मचारी आणि अधिकारी उपस्थित होते. आशादीप संस्थेचे संचालक दिलीप रेडकर यांनी महवितरण कंपनीचे कर्मचारी आणि अधिकारी यांचे नेहमीच चांगले सहकार्य मिळते असल्याचे सांगितले. संस्थेतर्फे नवीन इमारतीचे काम करण्यात येणार आहे. त्यासाठी मदत करावी, असेही आवाहन त्यांनी या वेळी केले आहे.
चाैकट
सामाजिक बांधिलकी
वीज वसुलीच्या उद्दिष्टपूर्तीसाठी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना कठाेर पावले उचलावी लागतात. मात्र, महावितरण कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी सातत्याने प्रयत्नपूर्वक जपली आहे. विविध गरीब वस्त्यांमध्ये धान्यवाटप, कोविड सेंटरमध्ये गरम पाण्यासाठी बाटल्या देणे एवढेच काय तर एकाकी वृद्ध महिलेला महावितरण कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी स्वखर्चाने वीज कनेक्शन दिले. ‘त्या’ गरीब महिलेचे एक वर्षाचे वीज बिलही कर्मचाऱ्यांनी भरले आहे.