चिपळूण : शहर व परिसरात आलेल्या महापुरात महावितरणचे सुमारे दोन कोटींचे नुकसान झाले आहे. पूर ओसरल्यानंतर तातडीने पाणीपुरवठा योजना व रुग्णालयांचा वीजपुरवठा दुसऱ्याच दिवशी सुरू केला. महापुरात खराब झालेले १००० विद्युत मीटर बदलण्यात आले तर आणखी ३ हजार विद्युत मीटर उपलब्ध झाले आहेत. जेथे मीटर खराब झालेले आहेत तेही महावितरणकडून विनामूल्य बदलून दिले जात असल्याची माहिती चिपळूण विभागाचे कार्यकारी अभियंता कैलास लवेकर यांनी दिली.
चिपळूण, खेर्डी, कळंबस्ते, वालोपे, पेढे, कालुस्ते, मजरे काशी, मिरजोळी यासह खेड व चिपळूण तालुक्यातील सह्याद्रीच्या खोऱ्यांमध्ये वसलेल्या गावात अतिवृष्टीने प्रचंड नुकसान झाले होते. महावितरणचे सुमारे दोन कोटींचे नुकसान झाले. महावितरणची चिपळुणातील मुरादपूर व खेर्डी येथील उपकेंद्रे पाण्याखाली गेली होती. तर उच्चदाब असलेले २२४ व लघुदाबचे २५६ विद्युत खांब महापुरात कोसळले. तर २५ विद्युत रोहित्रे महापुरात निकामी झाली. कोसळलेले विद्युत पोल व खराब झालेले विद्युत रोहित्र नव्याने उभारण्यात आले. पुराचे पाणी ओसरल्यानंतर तातडीने दुसऱ्याच दिवशी नगर परिषदेच्या पाणी योजनेचा विद्युत पुरवठा सुरू करण्यात आला. त्याचबरोबर शहरातील रुग्णालये, कोविड सेंटर यांचाही वीजपुरवठा सुरू केला. शहर व परिसरातील गावे तसेच सह्याद्रीच्या खोऱ्यातील गावांमध्ये वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आव्हान महावितरणसमोर ठाकले होते. त्यासाठी मोठ्या मनुष्यबळाची आवश्यकता होती. त्यामुळे खासगी ठेकेदार तसेच गुहागर, खेड, सावर्डे, लोटे येथील महावितरणची जादा कुमक मागवण्यात आली. त्याचबरोबर कल्याण व डोंबिवली येथून इंजिनीअर घेण्यात आले. त्या सर्वांनी महापुरात कोसळलेले विद्युत खांब व विद्युत रोहित्र नव्याने उभारण्यासाठी मोलाचे योगदान दिले.
महापुरात बुडालेली मुरादपूर व खेर्डी येथील उपकेंद्रे सुरू करण्यासाठी मोठी मेहनत घ्यावी लागली. सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात महावितरणच्या चाचणी विभागाच्या स्पेशल चार टीम आहेत. या चारही टीम चिपळुणात आल्या होत्या. त्यांनी मोठ्या मेहनतीने उपकेंद्र विद्युत पुरवठा करण्यासाठी पूर्ववत केले. दुरुस्तीसाठी लागणारे मटेरियलही रत्नागिरी विभागीय कार्यालयाकडून तातडीने देण्यात आले. मुख्य अभियंता देवेंद्र सायनेकर हे चिपळुणात ठाण मांडून होते. या कामी चिपळूण विभागाचे कार्यकारी अभियंता कैलास लवेकर व त्यांच्या सहकाऱ्यांनी मोठी मेहनत घेतली.
-------------------------
नदीपलीकडील कामाचे आव्हान
खेर्डी येथून नदीच्या पलीकडे खेड तालुक्यात पुरवठा करणारी विद्युत वाहिनीही महापुरात कोसळली होती. येथे विद्युत वाहिनी टाकण्याचे काम आव्हानात्मक होते. एनडीआरएफ पथकाच्या साहाय्याने बोटीतून विद्युत वाहिनी खेर्डीतून नदीच्या पलीकडे नेण्यात आली. त्यामुळे चिपळूण व खेड तालुक्यातील नदीपलीकडच्या ३० हून अधिक गावांना वीजपुरवठा तातडीने सुरू होण्यास मदत झाली.