रत्नागिरी : निवृत्तीकडे झुकलेले त्यांचे वय, तरीही झुंजायची जिद्द एकाेणीस वर्षांची. ‘अशी लै वादळ पाहिली’ असे म्हणत वादळाशी झुंज देण्यासाठी ते सज्ज झाले. वादळ, पाऊस यांचा मारा झेलत ‘शेलार मामांच्या’ आवेशात ते विद्युत खांबावर चढून वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी धडपडत हाेते. तरुणांनाही लाजवेल असा हा त्यांचा उत्साह पाहून नवखेही उत्साहाने कामाला लागले आणि वादळाशी झुंज देत विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यशही मिळविले. या वादळाशी झुंज देणाऱ्या महावितरणमधील हरिश्चंद्र भिकाजी निंगवले अर्थात निंगवले मामांच्या धाडसाचे काैतुक हाेत असून, ते महावितरणचे ‘शेलार मामाच’ ठरले आहेत.
कोकण किनारपट्टीवर ताैक्ते चक्रीवादळ धडकले आणि सर्वाधिक फटका बसला ताे महावितरणच्या यंत्रणेला. प्रत्येक गावात, वाडीत वादळामुळे पडलेली झाडे, त्यामुळे मोडलेले विजेचे खांब, तुटलेल्या तारा हे चित्र संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यात दिसत होते; पण वादळाचा जोर कमी होताच वीज कामगार आणि अभियंते सर्वप्रथम कामाला लागले. नव्याने भरती झालेले, मध्यमवयीन आणि अनुभवाने शहाणे पण निवृत्तीला पोहाेचलेले वीज कामगार भर पावसात भिजत कामाला लागले. त्यातील एक निंगवले मामा.
खंडाळा शाखेत कार्यरत असणाऱ्या निंगवले मामाचे वय झाले एकोणसाठ, पण झुंजायची जिद्द एकोणीस वर्षांची. अशी लै वादळं पहिली म्हणून वारा जरा ओसरताच आपल्या भागातील वीज कामगारांची फौज घेऊन ते या नवीन लढाईला ‘शेलार मामांच्या’ आवेशाने कामाला लागले. स्वतः निंगवले मामा भर पावसात कामाला लागले. ज्या ठिकाणी गरज पडली, त्या ठिकाणी खांबावर चढून दुरुस्ती केली आणि मग पुढे पुढे जात काम करीत राहिले. खंडाळा परिसरातील सुतारवाडी, मिरवणे, वडवली, शिर्केवाडी, परटवणे अशा परिसरातील घरांतील वीजपुरवठा सुरळीत करण्यात आला. घरातील पुन्हा एकदा दिवा पेटविणाऱ्या ध्येयनिष्ठ निंगवले मामांना नागरिक आता तर महावितरणचे ‘शेलार मामा’ म्हणू लागले आहेत. या आणि अशाच महावितरणच्या गावोगावी काम करणाऱ्या अनेक ध्येयवेड्या अभियंते व कामगारांमुळे दुर्गम भागातील वीज ग्राहकांना आधार वाटतो.
---------------------------------
विद्युत पुरवठा सुरळीत हाेण्यासाठी भर पावसात वीज खांबावर चढून निंगवले मामांनी काम केले.