खेड : तौक्ते चक्रीवादळाने गेला आठवडाभर जिल्ह्याला झोडपून काढले आहे. आंबा बागेसह घर, गोठे यांचे नुकसान केले आहे. सतत पाऊस सुरू असल्याने मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर सध्या चौपदरीकरणाचे काम सुरू असल्याने चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे अनेक अपघात होत आहेत.
रस्त्याचे काम दर्जाहीन
गुहागर : तालुक्यातील तळवली, शेवरी फाटा ते हॉस्पिटल स्टॉप रस्ता डांबरीकरणाचे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले आहे. या रस्त्यावरील खडी उखडून गेली आहे. सतत वर्दळीचा हा मार्ग असूनही त्याच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष झाले आहे. पावसाळ्यात या रस्त्याची चिखलामुळे अधिकच दुर्दशा होणार आहे.
घरांची पडझड
रत्नागिरी : रविवारी जिल्ह्याच्या किनाऱ्यावर धडकलेल्या तौक्ते चक्रीवादळाने तालुक्यातील घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान केले आहे. दोन घरांचे पूर्णत: नुकसान झाले असून, ६७९ घरांचे अंशत: नुकसान झाले आहे. तसेच २०० झाडे बाधित झाली आहेत.
टॉवर जमिनदोस्त
मंडणगड : तालुक्यातील साखरी गावात अथक प्रयत्नामुळे मोबाईल टॉवर नुकताच उभारण्यात आला आहे. ग्रामस्थांच्या पाठपुराव्यामुळे हा टॉवर मंजूर होऊन त्याचे काम पूर्णत्वास गेले होते. मात्र नुकत्याच झालेल्या चक्रीवादळाने हा टॉवर जमिनदोस्त झाला असून, दोन तालुक्यातील ग्राहकांना नेटवर्क सुविधेपासून वंचित रहावे लागत आहे.
शेतीच्या कामांना प्रारंभ
देवरुख : तालुक्यात सध्या पाऊस सुरू झाला आहे. त्यामुळे जमीन शेतीसाठी अनुकूल झाली आहे. कोरोनाच्या काळात लॉकडाऊन सुरू झाले असले, तरीही बळीराजा आता शेतीच्या कामात व्यग्र होऊ लागला आहे. सध्या शेतजमीन उकळणीच्या कामाला वेगाने प्रारंभ करण्यात आला आहे.
डागडुजीची धावपळ
लांजा : पावसाळा जवळ आल्याने आता ग्रामीण भागातील घरे, गोठे यांच्या डागडुजीला प्रारंभ झाला आहे. प्रशासनानेही दुकाने चार तास सुरू ठेवण्यास परवानगी दिली आहे. त्यामुळे आता ग्रामीण जनता खरेदीसाठी मोठ्या प्रमाणावर गर्दी करू लागली आहे.
नद्यांच्या पातळीत वाढ
खेड : तौक्ते चक्रीवादळाच्या प्रभावाने पावसाची संततधार सुरु राहिल्याने जगबुडी आणि नारंगी या दोन्ही नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. मात्र सलग दोन दिवस सरी पडत असल्याने पाणी मोठ्या प्रमाणावर गढूळ झाले आहे. त्यामुळे नागरिकांनाही पाणी उकळून पिण्याचे आवाहन आरोग्य विभागाने केले आहे.
रस्त्याची दुरवस्था
देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील आरवली ते नाचरेवाडी हा दोन किलोमीटरचा रस्ता गेल्या कित्येक वर्षांपासून डांबरीकरणाअभावी पडून आहे. पावसाळ्यात ग्रामस्थांना चिखलमय मार्गावरून प्रवास करावा लागत आहे. या रस्त्याच्या डांबरीकरणाचा प्रश्न लवकरच मार्गी लावावा, असे आवाहन जनतेमधून करण्यात येत आहे.
वॉशिंग मशीन भेट
राजापूर : तालुक्यातील धारतळे येथे कोविड केअर सेंटर नव्याने सुरू करण्यात येत आहे. येथे दाखल झालेले रुग्ण यांच्यासाठी या कोविड सेंटरला राजापूर तालुका मराठा समाज सेवा संघाच्यावतीने वॉशिंग मशिन भेट देण्यात आले आहे. या आरोग्य केंद्राच्या नवीन इमारतीत ३५ खाटांचे कोविड केअर सेंटर सुरू होणार आहे.
परीक्षा १० जूनपासून
रत्नागिरी : वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या १० जूनपासून सुरू होणाऱ्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या असून, त्या १० ते ३० जून या कालावधीत घेण्यात येणार आहेत. या परीक्षांमध्ये एमबीबीएस, बीडीएस, बीएमएस, बीयूएमएस, बीएचएमएस, बीपीटीएच, बीएससी नर्सिंग, बीओटीएच आदी परीक्षांचा समावेश आहे.