नांदगांव : मालवण तालुक्यातील आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीच्या यात्रेनिमित्त खारदांडा मुंबई येथील श्री ओमसाई पदयात्रा मंडळाने मुंबई ते आंगणेवाडी अशी पदयात्रा काढली. ही पदयात्रा बुधवारी तळेरे येथे दाखल झाली. तब्बल बारा दिवसानंतर ही पदयात्रा सिंधुदुर्गात दाखल झाली.आंगणेवाडीच्या भराडी मातेच्या सेवेसाठी अनेक भाविक श्रद्धेने यात्रेला येत असतात. राज्यभरातून या यात्रेला भाविकांचा अक्षरश: महापूर असतो. खारदांडा येथील श्री ओमसाई पदयात्रा मंडळाने यावर्षी प्रथमच खारदांडा (मुंबई) ते आंगणेवाडी असा पायी प्रवास केला आहे. २३ जानेवारीपासून सुरु झालेली ही पदयात्रा ४ फेब्रुवारीला जिल्ह्यात दाखल झाली असून आंगणेवाडी येथे ५ फेब्रुवारीला पोहोचेल.या पदयात्रेत मंडळाचे विविध सभासद, तरुण वयोवृद्धांचा सहभाग आहे. या मंडळचे अध्यक्ष महेश चांगो, उपाध्यक्ष गणेश डिंबळे, प्रमुख सल्लागार चंद्रकांत फोमन, संदीप तुळसकर, भरत धनगर, मंगेश मगर, विकी बेडरे, भावेश बारिया, मनोज सोलंकी, तुषार टिवलेकर, पांडुरंग धावते, भरत लोंढे, भूमेन यामक, मिलिंद मठकर, राकेश कामत, रियाज खान असे १९ जणांचे पथक आले आहे. या यात्रेशिवाय गेली बारा वर्षे हे पथक अष्टविनायक यात्रा, हेदवीचा गणपती, गणपतीपुळे, वैष्णोदेवी, सालासर बालाजी मंदिर, ब्राह्मणदेव मंदिर अशा विविध धार्मिक क्षेत्रांची वारी करीत आहे. आंगणेवाडीच्या या पायी वारीदरम्यान विविध भागातील भाविक या वारीचे स्वागत करीत असून याबद्दल ते समाधानी आहेत. (वार्ताहर)
मुंबई-आंगणेवाडी पदयात्रा दाखल
By admin | Published: February 06, 2015 12:09 AM