आवाशी (खेड) - मुंबईतील अरबी समुद्रात होणाऱ्या शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमात बोट उलटून झालेल्या दुर्घटनेतील मयत सिध्देश सुभाष पवार (३६) हा मूळ गुणदे (ता. खेड, जि. रत्नागिरी) येथील रहिवासी आहे. त्याच्या निधनामुळे गुणदे गावावर शोककळा पसरली आहे.
सिध्देश हा चार्टर्ड अकाऊंटंट होता आणि एका खासगी कंपनीत नोकरी करत होता. तो सांताक्रूझ (मुंबई) येथे कुटुंबासह राहत होता. गुणदे येथे त्याचे वडिल एकटेच राहतात. सिध्देश याच्या आईचे १० वर्षांपूर्वीच निधन झाले आहे. मे महिन्यातच सिध्देशचा विवाह कणेरी मठ, कोल्हापूर येथे झाला होता. त्याला एक बहीण असून ती विवाहित आहे. विनायक मेटे यांच्या शिवसंग्रामचे जिल्हाध्यक्ष विक्रांत चाळके यांचा सिध्देश हा भाचा होता. सिध्देश हा बोट दुर्घटनेत बेपत्ता झाला होता. त्यानंतर रात्री उशिरा त्याचा मृतदेह बोटीतच अडकून पडल्याचे दिसून आले. त्याचा मृतदेह सापडल्याचे कळताच गुणदे गावावर शोककळा पसरली आहे.