रत्नागिरी : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामासाठी जिल्ह्यात जागोजागी डोंगराची कटिंग्ज जेसीबीद्वारे काढली जात आहेत. त्यामुळे महामार्गावर कोसळणाऱ्या या कटिंग्जचा धुरळा तेथील वातावरणात भरून राहिला आहे. त्याचवेळी उन्हाळी वातावरण असल्याने व महामार्ग रुंदीकरणात झाडांची कत्तल झाल्याने महामार्ग मोकळा झाला असून, सावलीचा पत्ताच नाही, अशी स्थिती आहे.आधीच महामार्गावर धुरळा व त्यात उन्हाचा जाळ यामुळे महामार्गावरून प्रवास करणे आगीतून प्रवास करण्यासारखे ठरत आहे.महामार्ग रुंदीकरणाचे काम जिल्ह्यात खेड व चिपळुण भागात जोराने सुरू आहे. राजापूर ते खारेपाटण भागातही काम जोरात आहे. आता आरवली ते कांटे दरम्यान कामालाही गती आली आहे. मात्र, महामार्ग रुंदीकरणासाठी हजारो झाडे तोडण्यात आली आहेत.रुंदीकरणाचा भराव करण्यात आला आहे. रुंदीकरणात अनेक ठिकाणचे डोंगर येत असून, ठेकेदारांकडून सध्या डोंगर कापण्याचे काम सुरू आहे. डोंगराची ही कटिंग्ज काढताना महामार्गालगत कोसळत असून, त्याचा प्रचंड धुरळा महामार्गावर दिसून येत आहे.चौपदरीकरणासाठी परशुराम घाट तसेच अन्य डोंगराचा भाग असलेल्या ठिकाणी सध्या जोरदार काम सुरू आहे.
अत्याधुनिक यंत्रांद्वारे डोंगर पोखरणे, कापणे, मार्ग रुंदीकरण करणे ही कामे वेगाने सुरू आहेत. पावसाळ्याआधीचा मे महिना तेवढा ठेकेदारांच्या हाती आहे. त्यामुळेच डोंगर कापण्याचे काम जोरात आहे. मात्र, डोंगराच्या लाल मातीचा धुरळा महामार्ग व्यापून राहिला आहे. मार्गावरून प्रवास करणाऱ्यांच्या नाका-तोंडामध्ये हा मातीचा धुरळा जात असल्याने प्रवासी हैराण झाले आहेत. डोंगर कापण्याचे काम योग्यरित्या झाले नाही तर पावसाळ्यात महामार्गावर दरडी कोसळण्याची भीती आहे.मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणासाठी डोंगरांची ही माती वापरली जात आहे. ही मातीच रस्त्याच्या दुतर्फा पसरवली जात आहे. झाडे तोडल्यानंतर झाडे लावली जाणार असल्याचे सांगितले जात आहे. परंतु, पाऊस जवळ आला तरी अद्यापही रस्त्याच्या दुतर्फा वृक्ष लागवडीची कोणतीही हालचाल दिसून येत नाही. मात्र, हटविलेल्या कटिंग्जनंतर डोंगराची माती सैल झाली आहे. पावसाळ्यात हे कापलेले डोंगर पाण्याने फुगून महामार्गावर दरड कोसळण्याची शक्यता आहे.कोकण रेल्वे मार्गावरही प्रकल्प उभारणीच्यावेळी अशीच कटिंग्ज काढण्यात आली होती. त्यानंतरच्या काही वर्षात पावसाळ्यात मार्गालगतच्या डोंगरांच्या दरडी मार्गावर कोसळण्याचे प्रकार झाले होते. त्यामुळे वाहतुकीला अडथळे आले. मुंबई-गोवा महामार्ग रुंदीकरणाचे काम सुरू असतानाही असाच धोका दरडींपासून दिसून येत आहे. त्यामुळे पावसाने फुगून या दरडी कोसळू नयेत, यासाठी महामार्ग विभाग व ठेकेदारांनी सर्वेक्षण करून धोकादायक ठिकाणी आवश्यक उपाययोजना तातडीने करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.