लांजा : तालुक्यातील काजळी व मुचकुंदी नद्यांनी रौद्ररूप धारण केले आहे. पावसाची संततधार सुरू राहिली तर मुंबई-गोवा महामार्गावरील आंजणारी व वाकेड पुलावरून पाणी जाण्याची भीती व्यक्त केली जात आहे. गुरुवारी सकाळी काजळी नदीला आलेल्या पुरामुळे अंजणारीतील ब्रिटिशकालीन पुलाला पाणी टेकले असून, मुंबई-गोवा महामार्ग ३ तास वाहतुकीसाठी बंद करण्यात आला होता.
तर आंजणारी येथील काजळी नदीच्या शेजारी असणारे श्री दत्तमंदिर पाण्याखाली गेले आहे. यासह नदी शेजारील लोकवस्तीमध्येही पाणी शिरले आहे. तालुक्यातील मुचकुंदी, बेनी या प्रमुख नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. भांबेड येशील मुचकुंदी नदीच्या पुराचे पाणी शेजारील घरांमध्ये शिरल्याने घरांचे नुकसान झाले आहे. नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडल्याने लांजा आगारातील सकाळ सत्रातील एस. टी. फेऱ्याही रद्द करण्यात आल्या आहेत.