रत्नागिरी : कोकणात पावसाने जोर धरला आहे. या मुसळधार पावसामुळे खेडमधील जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून मुंबई-गोवा महामार्गावरचा जगबुडी पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला. तसेच, पुलाजवळ सुरक्षारक्षक व पोलिस तैनात करण्यात आले आहेत.
रत्नागिरी जिल्ह्यात मुसळधार पर्जन्यवृष्टी झाल्याने संपूर्ण जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. जगबुडी नदीचा उगम असलेल्या सह्याद्रीच्या खोऱ्यात जोरदार पाऊस झाल्याने नदीच्या पातळीने धोक्याची पातळी ओलांडली. तसेच, चिपळूणमधील वाशिष्ठी नदीच्या पाण्याची पातळी वाढली आहे. या दोन्ही नद्यांचा पूल वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे मुंबई-गोवा महामार्ग वाहतूक ठप्प झाली आहे.