आॅनलाईन लोकमतपाली (जि. रत्नागिरी), दि. २२ : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणातील भूसंपादित होणाऱ्या मालमत्ता व इतर संसाधनाच्या मोबदला वाटपाचे रत्नागिरी तालुक्यातील काम अंतिम टप्प्यात आले आहे. अत्यंत संवेदनशील व नागरी वस्तीही विस्थापित होणाऱ्या पाली बाजारपेठ, मराठवाडी या गावातील भूखंडधारक प्रकल्पबाधितांसमोर सध्या यापूर्वी भूसंपादित न झालेल्या रस्त्याच्या मध्यबिंदूपासून दोन्ही बाजूच्या १५ मीटर असे एकूण ३० मीटर रूंदीचा जमिनीचा मोबदला मिळणार नसल्याने फक्त ७.५ मीटर संपादित भूखंडाचा मोबदला मिळणार असल्याने मोठा पेच निर्माण झाला आहे.मुंबई - गोवा हा राष्ट्रीय महामार्ग जिल्हा मार्ग असताना एक गाडी जाईल इतकाच रुंद होता. पुढे त्याचे राज्य महामार्ग, राष्ट्रीय महामार्ग व आता आशियाई महामार्गात रुपांतर झाले आहे. मात्र, पहिल्यांदा पाली बाजारपेठ येथे १९८४-८५ला ग्रामस्थांच्या तोंडी संमतीने सार्वजनिक बांधकाम विभागाने या जुन्या रस्त्याचे रुंदीकरण केले.
त्यानंतर पुढे २००० - ०१ला पुन्हा काही मीटरने हाच महामार्ग जुन्याच पद्धतीने तोंडी संमतीवर रुंद केला. त्यावेळी या बाजारपेठेतील अनेकांना या रुंदीकरणामध्ये आपली दुकाने रुंदीकरणासाठी तोडावी लागली होती. तरीही त्यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाने यापुढे मोठे रुंदीकरण होणार नाही फक्त एकदाच सहकार्य करा, असे सांगितले होते. त्यामुळे कोणी विरोध केला नव्हता. मात्र, रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या जमीनमालकांना या दोन्हीही महामार्ग रुंदीकरणाच्या वेळी कोणताही मोबदला भूसंपादनाबाबत दिलेला नव्हता. त्यातच आता प्रस्तावित महामार्गांच्या चौपदरीकरणामध्ये पाली बाजारपेठ, मराठवाडी येथील जमीन संपादित होताना दुतर्फा फक्त ७.५ मीटरचाच मोबदला भरपाई मिळणार आहे.
यापूर्वी येथील जमीनधारकाना भूसंपादन मोबदला दिल्याच्या महसूल व भूमी अभिलेख विभागाकडे दस्तऐवजामध्ये कोणत्याही नोंदीचा उल्लेख नसतानाही त्या जमिनीचा मोबदला देण्याचे शासन नाव घेत नसल्याने प्रकल्पबाधितांमध्ये चीड आहे. तसेच येथील अनेकांचे भूखंड हे अवघ्या २ ते ३ गुंठे एवढ्या कमी क्षेत्रफळाचे असून, ते बहुतांश ठिकाणी संपूर्णत: संपादित होत असल्याने त्यातील फक्त ७.५ मीटर भागाच्या संपादनाचा मोबदला दिला जाणार आहे. त्यामुळे अनेकांचे आर्थिक नुकसान होणार असल्याचे बोलले जात आहे.
महामार्गाची नुकसान भरपाई देताना किमान पाली बाजारपेठ, मराठवाडी या गावातील भूखंडधारकांचे मोठे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी तरी मोबदला वाटप करण्यापूर्वी नव्याने सध्याच्या रस्त्याच्या मध्यबिंदूपासून संपादित होणाऱ्या दुतर्फा २२.५ मीटर रुंद म्हणजे एकूण ४५ मीटर रुंदीचे भूखंडाचे मूल्यांकन करुन तसा मोबदला संपूर्ण भूखंडाचा द्यावा, अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत. त्यामुळे पाली बाजारपेठ, मराठवाडी येथील ३० मीटर रुंदीचे संपादन करताना मोबदला प्रत्यक्षात न दिलेल्या जमिनीवरून वातावरण तापण्याची शक्यता दिसत आहे.