राजापूर : मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामामुळे गेले वर्षभर तालुक्यातील कोदवली तेथील एक स्वच्छ पाण्याचा झरा सर्वांचे खास आकर्षण बनला आहे. या झऱ्याला शुध्द व स्वच्छ पाणी येत असल्याने महामार्गावरुन प्रवास करणारे अनेक प्रवासी येथून पाण्याच्या बाटल्या भरुन नेताना दिसतात.राजापूर शहरापासून काही अंतरावर व कोदवली हद्दीत हा झरा आहे. गेली दोन वर्षे मुंबई - गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरु असून, त्या दरम्यान कोदवली येथील एक अवघड वळण काढून बाजूला असलेला डोंगर पोखरुन त्यामधून मार्ग काढताना खोदकामादरम्यान एका ठिकाणी अचानक पाण्याचा झरा सापडला.
सुरुवातीला एखादी पाईपलाईन फुटली असेल किंवा जमिनीतून पाणी बाहेर येत असावे, असे महामार्गाचे काम करणाऱ्या कामगारांना वाटले. मात्र, बाहेर पडणारे पाणी स्वच्छ होते. त्यावेळी काहींनी त्याची चव चाखली असता, ते गोड असल्याचे जाणवले.गोड्या पाण्याचा स्रोत असेल, असा विचार करुन डोंगरातून वाहणारा तो झरा न बुजवता महामार्गाच्या बांधकामादरम्यान त्या डोंगरातून एका पाईपद्वारे पाणी बाहेर काढण्यात आले आहे. या भागातील महामार्गाचे काम पूर्ण झाले असून, वाहणाऱ्या झऱ्याजवळील संरक्षक भिंत बांधून पूर्ण झाली आहे. त्यामधून एका पाईपद्वारे तो झरा पाण्याच्या प्रवाहरुपात वाहत आहे.पावसाळा असो किंवा त्यापूर्वीचा उन्हाळा असो या झऱ्याच्या प्रवाहात जराही फरक पडलेला नाही. प्रवाह कधी कमी-जास्त झाल्याचेही आढळून आलेले नाही. या झऱ्याच्या वरील बाजूला जल असे दगडावर पिवळ्या रंगाने लिहिले आहे. महामार्गावरील हा झरा तहानलेल्यांसाठी हक्काचे ठिकाण बनला आहे.