पनवेल / अलिबाग / रत्नागिरी: मुंबई-गोवामहामार्गाच्या रुंदीकरणाबाबत दोन कंत्राटदार बदलावे लागले. सन २०११ मध्ये बांधकामासाठी दोन स्ट्रेच दिलेल्या संबंधित कंत्राटदारांना या कामातील दिरंगाईसाठी जबाबदार धरले. आठ वर्षांच्या कार्यकाळात अधिकारी बदलले, कंत्राटदार बदलले, त्यामुळे मुंबई-गोवामहामार्ग रखडला, अशी माहिती केंद्रीय रस्ते वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. तसेच आता मी या खात्यावर कायम असल्याने येत्या डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होईल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.
तीन प्रकल्पांचा भूमिपूजन सोहळा नितीन गडकरी यांच्या हस्ते खारपाडा टोल प्लाझा येथे झाला. त्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. या रखडलेल्या मार्गाचे काम पूर्णत्वास नेण्यासाठी मी स्वतः कंत्राटदार जे. एम. म्हात्रे यांच्या मागे लागलो, त्यानंतर त्यांनी या कामाची जबाबदारी स्वीकारल्याचे गडकरींनी यावेळी सांगितले. पळस्पे ते इंदापूर महामार्गही डिसेंबरपर्यंत पूर्ण होईल असे गडकरींनी सांगितले. यावेळी गडकरी यांनी १३ हजार कोटी रुपयांच्या रस्त्याच्या बांधकामाची घोषणा केली, जो जवाहरलाल नेहरू बंदरातून जाईल आणि मुंबई ते दिल्ली अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ १२ तासांपर्यंत कमी करेल.
कार्यक्रमाप्रसंगी खासदार श्रीरंग बारणे, खासदार सुनील तटकरे, राज्याचे उद्योगमंत्री तथा रायगड-रत्नागिरी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, आमदार रवींद्र पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, माजी खासदार रामशेठठाकूर,जे. एम. म्हात्रे, अपर जिल्हाधिकारी अमोल यादव, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, मुंबई विभागाचे क्षेत्रीय अधिकारी अंशुमाली श्रीवास्तव, मुख्य अभियंता एस शेलार, पनवेल प्रांताधिकारी राहुल मुंडके, पेण प्रांताधिकारी विठ्ठल इनामदार, पनवेल तहसीलदार विजय तळेकर, पेण तहसीलदार स्वप्नाली डोईफोडे आदी उपस्थित होते.
महामार्गावर टोल नकोच आजवर या मार्गावर हजारोंना जीव गमवावा लागला. या मृतांना खऱ्या अर्थाने श्रद्धांजली वाहायची असेल तर या मार्गावर टोल नाके नको, अशी मागणी सामाजिक कार्यकर्ते संतोष ठाकूर यांनी केली.
उपग्रहावर आधारित टोल वसुलीमहामार्गांवर उपग्रह-आधारित भाडे संकलन सुरू करण्याच्या प्रक्रियेत आहे. यामुळे टोल भरण्यासाठी टोल नाक्यावर वाहनांच्या रांगा लागणार नाहीत, अशी माहिती गडकरी यांनी दिली.