चिपळूण : मुंबई - गोवामहामार्ग चौपदरीकरणांतर्गत चिपळुणात उभारण्यात येणाऱ्या कोकणातील सर्वांत मोठ्या उड्डाणपुलाच्या कामासह अन्य काँक्रिटीकरणालाही वेग आला आहे. विशेषतः परशुराम घाटातील चौपदरीकरणाचे काम जोरदार सुरू असून, मार्चअखेरपर्यंत काँक्रिटीकरणाचा एकेरी मार्ग सुरू करण्याचा प्रयत्न आहे. त्यातील बहुतांश टप्पा १५ मार्चपूर्वी गाठण्याचा प्रयत्न ठेकेदार कंपनीमार्फत सुरू आहे. महिनाभरात चिपळूणच्या वाशिष्ठी पुलापर्यंत चौपदरीकरण पूर्ण करण्यात येणार आहे.परशुराम ते आरवलीदरम्यानच्या कामाचा वेग वाढला आहे. मात्र, अजूनही काही भागातील जागा ताब्यात घेणे, मोऱ्या व गटारे उभारणे अशी कामे सुरू आहेत. सुमारे ३६ किलोमीटरच्या अंतरातील हे काम टप्प्याटप्प्याने केले जात आहे. चिपळूण शहरासह कापसाळ, कामथे घाट, कोंडमळा व सावर्डे या भागात काही ठरावीक अंतराचे काँक्रिटीकरणाचे काम शिल्लक आहे. त्याशिवाय या महामार्गावर बहादूरशेख नाका ते युनायटेड इंग्लिश स्कूलदरम्यान उभारण्यात येत असलेल्या सर्वांत लांब उड्डाणपुलाच्या कामालाही गती प्राप्त झाली आहे.या पुलाची लांबी साधारण १८४० मीटर, तर रुंदी ४५ मीटर इतकी आहे. या पुलाचे काम एकाच वेळी चार ठिकाणी सुरू आहे. पुलासाठी एकूण ४६ पिअर उभारले जात आहेत. या महिन्यात एकाचवेळी दोन्ही बाजूंनी गर्डर पिअरवर चढवले जाणार आहेत. त्याशिवाय सर्व्हिस रोडच्या काँक्रिटीकरणाचे कामही लवकरच सुरू केले जाणार आहे.
येत्या १५ मार्चपर्यंत टप्प्याटप्प्याने एका मार्गावरचे काँक्रिटीकरण पूर्ण करून मार्च महिनाअखेर चिपळूणच्या वाशिष्ठी पुलापर्यंत चौपदरीकरणाचे काम जोडले जाणार आहे. तसेच वालोपे येथील ६०० मीटरचे शिल्लक काँक्रिटीकरणही तातडीने केले जाणार आहे. एकाचवेळी ४०० मीटरचे काँक्रिटीकरण करण्याची क्षमता असल्याने मार्च अखेरपर्यंत काम पूर्ण करण्याचा विश्वास कंपनी व्यवस्थापनाने व्यक्त केला आहे.
उपअभियंता प्रकाश निगडे यांची बदलीराष्ट्रीय महामार्ग विभागाचे उपअभियंता प्रकाश निगडे यांची पुणे येथे बदली झाली आहे. निगडे यांनी गेली दोन वर्षे चौपदरीकरणाच्या कामात विशेष लक्ष दिले होते. सर्व्हिस रोड व चौपदरीकरणातील अन्य समस्या सोडवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले. चिपळूण - गुहागर बायपास रस्त्याचा ‘मास्टर प्लॅन’ तयार करून मंजुरीसाठी सादर केला. पावसाळ्यापूर्वी परशुराम घाटातील चौपदरीकरण पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्न करीत असतानाच त्यांची बदली झाली. ही जबाबदारी तूर्तास प्रभारी अधिकाऱ्यांकडे सोपविली आहे.