रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरकीरणाचे काम गेले अकरा महिने रखडले आहे. याप्रश्नी महाविकास आघाडीने चिपळूण शहरातील पॉवर हाऊस येथे चक्काजाम आंदोलन केले. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर खासदार विनायक राऊत, आमदार शेखर निकम, माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्यासह कार्यकर्त्यांनी रस्त्यावरच ठिय्या मांडला होता. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.
हातखंबा, पाली, चिपळूण, लांजा आणि राजापूर येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महामार्ग रोखून धरला होता. महामार्ग रोखणार्या शिवसैनिकांना यावेळी पोलिसांनी ताब्यात घेतले.मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम गेले अकरा महिने रखडले आहे. त्यामागून मंजूर झालेला समृद्धी महामार्ग पूर्ण होत आला आहे. ठेकेदार व अधिकारी सूचना देऊनही ऐकत नाहीत, अशी परिस्थिती आहे. याप्रश्नी काम न करणाऱ्या ठेकेदारांना शिवसेना स्टाईल धडा शिकवण्यासाठी आज, गुरुवारी मुंबई-गोवा महामार्गावर चक्काजाम आंदोलन करण्यात आले. यात जिल्हाप्रमुख सचिन कदम, तालूकाध्यक्ष जयंद्रथ खताते, शहराध्यक्ष मिलींद कापडी, कॉंग्रेस तालूकाध्यक्ष प्रशांत यादव, लियाकत शाह यांनी सहभाग घेतला.वाकेड ते आरवली हे दोन टप्पे प्रामुख्याने रखडले असून, या क्षेत्रात नऊ ते दहा टक्केच कामे झाली आहेत. अनेक ठिकाणी अर्धवट कामांमुळे नागरिक मेटाकुटीला आले आहेत. महामार्गाच्या कामाबाबत जनतेकडून संताप व्यक्त होत असल्याने केंद्र शासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हे आंदोलन करण्यात आले. मात्र केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या आश्वासनानंतर हे आंदोलन स्थगित करण्यात आले.