रत्नागिरी : कोकणातील मोठा उत्सव म्हणजे शिमगा. होळीच्या सणासाठी कोरोनाचे ‘हाॅटस्पाॅट’ असलेल्या मुंबई- पुणे यांसारख्या शहरांमधून आलेल्या लोकांमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक वाढला आहे. या वाढत्या संख्येने जिल्ह्याची चिंता वाढली असून आरोग्य यंत्रणेची पुन्हा रात्रंदिवस धावपळ सुरू झाली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात शिमगोत्सवासाठी मोठ्या प्रमाणावर मुंबईकर गावी येणार, त्यामुळे रुग्ण वाढणार, ही शक्यता आरोग्य विभागाकडून व्यक्त होत होती. तसेच कामानिमित्त पुणे-मुंबई या शहरांमध्ये ये-जा करणाऱ्यांची संख्याही अधिक आहे. होळीसाठी कोकण रेल्वे, तसेच एस.टी. बस, खासगी गाड्यांमधून आलेल्या नागरिकांमुळे आता काेरोना रुग्णांची संख्या वाढली असून १५ दिवसांत ८०० रुग्ण वाढले आहेत.
बाहेरगावातून येणारे चाचणीबाबत उदासीन
* कोकण रेल्वेने येणाऱ्या लोकांची रेल्वे प्रशासनाकडून रेल्वेस्थानकावर सुरुवातीला चाचणी करण्यात येत होती. मात्र, होळीच्या काळात कुठल्याही स्थानकावर चाचणी होत नाही.
* बसमधून येणाऱ्या नागरिकांबाबतही हीच स्थिती आहे. त्यामुळे एस स्थानकांवरही कुठेच चाचणी घेण्यात आलेली नाही. त्यामुळे मुंबईकर थेट आपल्या घरी विनाचाचणी पोहोचले.
* खासगी वाहने तसेच ट्रॅव्हलर्समधून येणाऱ्या नागरिकांसह बाहेरून येणाऱ्या सर्च नागरिकांना कोरोना चाचणी करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासन तसेच आरोग्य विभागाकडून करण्यात आले होते. मात्र, नागरिकांकडून त्याबाबत फारसे गांभीर्य दाखविले गेले नाही.
मुंबई-पुणे आदी भागातून दररोज सुमारे ४५०० प्रवासी जिल्हाभरात आले
एसटी बस
एस.टी. महामंडळाने होळीसाठी १६५ गाड्या सोडल्या होत्या. यातून सुमारे १०,००० व्यक्ती जिल्ह्यात आल्या.
ट्रॅव्हल्स, खासगी वाहने
आवडत्या होळी सणासाठी खासगी वाहने तसेच टॅव्हलर्स यामधून येणाऱ्यांची संख्या १२ ते १५ हजार इतकी होती.
कोकण रेल्वे
शिमगोत्सवात कोकण रेल्वेने विशेष गाड्या सोडल्याने या गाड्यांमधून सुमारे २० हजार नागरिक रत्नागिरी जिल्ह्यात आले.