लोकमत न्यूज नेटवर्क
रत्नागिरी : मुंबई विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे परीक्षेबाबत मुलांमध्ये निर्माण झालेला संभ्रम आता दूर झाला आहे. या परीक्षांचे नियोजन हे क्लस्टर महाविद्यालय या संकल्पनेनुसार होणार आहे.
विद्यापीठाच्या परिपत्रकानुसार सत्र १ ते ४ च्या नियमित व बॅकलॉगच्या विद्यार्थ्यांची परीक्षा दि. १५ एप्रिल ते दि. ५ मे या कालावधीत घेण्यात येणार आहे. सत्र ६ च्या नियमित व बॅकलॉगच्या परीक्षा दि. ६ ते २१ मे, तर सत्र ५ च्या बॅकलॉगच्या परीक्षा दि. २४ मे ते दि. २ जूनअखेर घेण्यात येणार आहेत. परीक्षांचे नियोजन हे क्लस्टर महाविद्यालय या संकल्पनेनुसार होणार आहे. यातील प्रमुख महाविद्यालयांकडे त्यांच्याअंतर्गत येणाऱ्या महाविद्यालयांच्या परीक्षा सुरळीत होण्याबाबत जबाबदारी दिली जाणार आहे. प्रश्नपत्रिका या क्लस्टर महाविद्यालयांच्या माध्यमातून तयार केल्या जाणार आहेत. तोंडी परीक्षा दि. ५ एप्रिलपासून विविध मिटिंग अॅप्सच्या माध्यमातून घेण्यात येणार आहेत.
कला, वाणिज्य व विज्ञान या पारंपरिक अभ्यासक्रमांच्या पदवी व पदव्युत्तर परीक्षेसाठी ५० गुणांची परीक्षा घेण्यात येणार आहे. यामध्ये ५० बहुपर्यायी प्रश्न आहेत. त्यासाठी एक तासाचा कालावधी दिला जाणार आहे. व्यावसायिक अभ्यासक्रमांची परीक्षा ८० गुणांची होणार आहे. यामध्ये ४० गुण हे बहुपर्यायी प्रश्नांसाठी, तर ४० गुण वर्णनात्मक प्रश्नांची उत्तरे लिहिण्यासाठी असणार आहेत. यासाठी विद्यार्थ्यांना दोन तास वेळ देण्यात येणार आहे. आर्किटेक्चर शाखेच्या परीक्षेसाठी ४० गुणांची बहुपर्यायी, तर ८० गुणांची डिझाईन प्रश्नांवर आधारित परीक्षा होणार आहे. विधी शाखेची परीक्षा ६० गुणांची होणार असून ३० गुणांचे बहुपर्यायी आणि ३० गुणांचे वर्णनात्मक प्रश्न असणार आहेत. विद्यार्थ्यांनी महाविद्यालयीन स्तरावरून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे, असे सांगण्यात आले आहे.