रत्नागिरी, दि. ३ : रत्नागिरी नगर परिषदेने आजपासून शहरात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू केली आहे. पहिल्याच दिवशी नगरपरिषदेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने मारुती मंदिर, आरोग्यमंदिर व अन्य भागातील खोके पोलीस बंदोबस्तात हटवले.
काही ठिकाणी खोक्यांजवळ केलेली दगडी बांधकामे जेसीबीद्वारे जमीनदोस्त करण्यात आली. त्यामुळे वाहतुकीत येणारे अडथळे दूर झाले आहेत. ही मोहीम अशीच सुरू ठेवली जाणार असल्याची माहिती मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी प्रसारमाध्यमांना दिली.
रत्नागिरी शहरातील मारुती मंदिर, आरोग्यमंदिर, साळवी स्टॉप, माळनाका, जयस्तंभ, राजीवडा, मिरकरवाडा तसेच शहर बाजारपेठेतही अनेक ठिकाणी अतिक्रमणे करण्यात आली आहेत. शहर बाजारपेठेत गटारांच्या जागेवरही अतिक्रमणे करण्यात आली आहेत.
याबाबत नगरपरिषदेकडे नागरिकांकडून सातत्याने तक्रारी केल्या जात होत्या. त्याची नगराध्यक्ष राहुल पंडित यांनी त्याची गंभीर दखल घेतली. त्यानंतर ही मोहीम सुरू झाली आहे.