राजापूर : येथील नगरपरिषदेची सभा नगराध्यक्ष ॲड. जमीर खलिफे यांच्या अध्यक्षतेखाली सोमवारी (दि.२२) सकाळी ११.३० वाजता ऑनलाईन पद्धतीने होणार आहे. यावेळी शहरातील सुधारित पूररेषेबाबत आक्षेप नोंदविणे, शीळ धरण पाणी आरक्षित ठेवण्याबाबत चर्चा करण्यात येणार आहे.
पंचायत समिती सभा
राजापूर : येथील पंचायत समितीच्या आढावा बैठक शुक्रवारी (दि. १८) घेण्यात येणार आहे. ही सभा ऑनलाईन होणार असून, यावेळी पंचायत समितीच्या विविध प्रशासकीय विभागांचा आढावा घेण्यात येणार आहे.
ऑनलाईन नोंदणी
दापोली : येथील युवासेनेतर्फे तालुक्यातील रिक्षाचालकांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर केलेली आर्थिक मदत मिळण्यासाठी मोफत ऑनलाईन रजिस्ट्रेशन सुविधा सुरू करण्यात आली आहे. हा उपक्रम दि. २१ जूनपर्यंत राबविण्यात येणार आहे.
पुलावर खड्डे
चिपळूण : काडवली (खेड) -निरबाडे (चिपळूण) या दोन गावांना जोडणाऱ्या पुलावर मोठ्या प्रमाणावर खड्डे पडले असल्याने या खड्ड्यांमध्ये पाणी साचत आहेत. वाहनचालकांना अंदाज येत नसल्याने अपघात होत आहेत. या विषयाकडे संबंधित प्रशासनाने लक्ष द्यावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
तपासणी केंद्राची मागणी
लांजा : तालुक्यातील देवधे येथे सुरू असलेले तालुक्यातील एकमेव कोविड तपासणी केंद्र हे लांजा शहरापासून तीन किलोमीटरवर आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना याठिकाणी तपासणीसाठी जाणे त्रासदायक ठरत आहेत. शहरात कोरोना तपासणी केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे.
ग्रामपंचायतींचा पुढाकार
खेड : तालुक्यातील ११४ ग्रामपंचायतींपैकी २१ ग्रामपंचायतींची लोकसंख्या दोन हजारांपेक्षा अधिक असल्याने शासनाच्या नवीन धोरणांनुसार या गावांमध्ये विलगीकरण कक्ष सुरू करण्यासाठी पंचायत समितीकडून प्रयत्न सुरू आहेत. भरणे, आंबडस, सुसेरी-खारी, नांदगाव या चार ग्रामपंचायतींनी विलगीकरण कक्ष सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला आहे.
चवे येथे वृक्षारोपण
रत्नागिरी : तालुक्यातील चवे गावातील ब्रह्मवृंदांनी २०० झाड लावली आहे. कोरोनाकाळात गावातील मुलांनी १०० पेक्षा जास्त वेगवेगळ्या प्रकारची रोपे तयार केली. गावातील रस्त्याच्या बाजूने वृक्षारोपण करण्यात आले. बदाम, गिरीपुष्प, वड, जांभूळ अशी विविध झाडे लावली आहेत.
रस्त्यावर पाणी
खेड : तालुक्यातील चिंचघर-वेताळवाडी येथे खडे दापोली मुख्य मार्गावर रस्त्याच्या गटारांची साफसफाई न झाल्याने पावसाचे पाणी वाहू लागल्याने पादचाऱ्यांसह वाहनचालकांची तारांबळ उडत आहे. पावसाळ्यापूर्वी मुख्य रस्त्याच्या गटारांची साफसफाई सार्वजनिक बांधकाम विभागाकडून होणे आवश्यक आहे.
क्रीडांगणाची दुरावस्था
रत्नागिरी : येथील छत्रपती शिवाजी क्रीडांगणावर कोरोना विलगीकरण केंद्र सुरू केले आहे. क्रीडांगणाच्या प्रवेशद्वाराची दुरावस्था झाली आहे. विलगीकरण केंद्रामुळे वाहनांची वर्दळ वाढली असल्याने लाॅनही खराब झाली आहे. त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
गरजूंना मदत
साखरपा : संगमेश्वर तालुक्यातील भडकंबा ग्रामपंचायतीच्या सदस्यांनी सामाजिक बांधीलकी जोपासत गरजू कुटुंबियांना मदतीचा हात दिला आहे. लाॅकडाऊनमुळे अनेकांचे रोजगार गेल्याने होणारे गरीब कुटुंबांचे हाल थांबविण्यासाठी मदतीसाठी सदस्यांनी पुढाकार घेतला आहे.