देवरुख : आंबा घाटात खोल दरीत मृतावस्थेत सापडलेल्या अनोळखी तरुणाची ओळख पटली असून, आर्थिक कारणांमुळे त्याचा खून त्याच्याच मित्रांनी केल्याचे तपासात पुढे आले आहे. या प्रकरणी एका अल्पवयीन मुलासह तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. खून झालेल्या तरुणाचे नाव महादेव किसन निगडे (३०, रा. तारदाळ शिवाजी चौक, गणेश मंदिर, तालुका हातकणंगले, जिल्हा कोल्हापूर) असे आहे. गाळ्याच्या आर्थिक व्यवहारातून हा खून करण्यात आला असल्याचे तपासात पुढे आले आहे.
देवरुख पोलीस स्थानकातून मिळालेल्या माहितीनुसार, सूरज मेहबूब चिकोडे (२४, रा. तारदाळ मराठी शाळेजवळ) आणि गणेश उर्फ हंप्या राजेश शिवारे (२८, तारदाळ स्वामी गल्ली) अशी या प्रकरणातील संशयित आरोपींची नावे आहेत. यातील तिसरा संशयित आरोपी अल्पवयीन आहे. त्यांच्यावर भारतीय दंड विधान कलम ३०२, २०१, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
५ मे रोजी आंबा घाटात गाय मुखाजवळ खोल दरीत मृतदेह सापडला. मृतदेह सडला असल्याने आधी त्याची ओळख पटत नव्हती. देवरुख पोलीस आणि स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेने संयुक्तरीत्या तपासाची चक्र वेगाने फिरवत गुन्ह्याचा छडा यश मिळवले. समांतर तपास चालू असतानाच सिटीझन पोर्टल आणि सीसीटीएनएस कार्यप्रणालीवरून कोल्हापूर, सांगली, सातारा येथून बेपत्ता असलेल्यांची माहिती मिळवली. यात महादेव निगडे यांच्या मिळतीजुळती माहिती मिळाल्यानंतर देवरुख पोलीस आणि गुन्हा अन्वेषणचे पथक शहापूर येथे पडताळणी करून आले.
मयत निगडे याची आई अंजना किसन निगडे आणि चुलत भाऊ अक्षय निगडे यांना अंगावरील रंगीत कपडे दाखवल्यानंतर त्यांनी हे कपडे महादेव निगडे याचेच असल्याचे सांगितले. त्यानंतर तपासाला पुढे वेग आला. मयत महादेव आणि सूरज मेहबूब चिकोडे यांच्यामध्ये गाळ्याच्या आर्थिक व्यवहारातून वाद झाल्याचे स्पष्ट झाले. मोबाइल रेकॉर्ड तपासल्यावर पोलिसांना काही ठोस धागेदोरे मिळाले. त्यातून चिकोडे याच्याकडे तपास केल्यानंतर गुन्ह्याची उकल होत गेली. चिकोडे, गणेश शिवारे आणि एक अल्पवयीन मुलगा या तिघांनी संगनमताने खून केल्याची कबुली दिली.