राजापूर : शहरातील तरुण सलून व्यावसायिक राजेश वसंत चव्हाण याचा झालेला खून हा चोरीच्या उद्देशाने झाल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. त्यामुळे या प्रकरणी संशयीत रूकसार उर्फ सलमान मोहमद सलमानी (२५, रा.उत्तरपदेश, सध्या राजापूर) याच्या विरोधात दाखल गुन्ह्यात आता चोरीच्या ३९७ कलमाची वाढ करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी दिली आहे.पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर यांनी सोमवारी पत्रकारांना याबाबत माहिती दिली. त्यांनी सांगितले की, शहरातील रानतळे येथील सड्यावर ९ मार्च रोजी राजापुरातील तरुण सलून व्यावसायिक राजेश वसंत चव्हाण (४०, रा. चव्हाणवाडी, राजापूर) याचा संशयास्पदरित्या मृतदेह आढळला होता. त्याच्या डोक्यात दगड घालून त्याचा खून झाल्याचे उघड झाले होते.
या प्रकरणी तातडीने तपास करत राजापूर पोलिसांनी रूकसार उर्फ सलमान मोहमद सलमानी याला अटक केली होती. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्याची माहिती त्यावेळी पोलिसांनी दिली होती. त्यानुसार सुरुवातीला भारतीय दंड विधान कलम ३०२ व पुरावा नष्ट केल्याप्रकरणी २०१ अन्वये गुन्हा दाखल केला होता.पोलीस तपासात हा खून चोरीच्या हेतूने झाल्याचे पुढे आले आहे. आरोपीकडून काही मुद्देमालही जप्त करण्यात आला आहे. त्यामुळे याप्रकरणी आता ३९७ अन्वयेही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील संशयिताला १५ मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. अजूनही पोलीस या प्रकरणी सखोल तपास करत आहेत. विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेज, जबाब नोंदविण्यात आल्याचे परबकर यांनी सांगितले.