दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील वनोशी खोत वाडीत तीन वयोवृध्द महिलांची हत्या करण्यात आलीय. पार्वती परबत पाटणे (वय ९०), सत्यवती परबत पाटणे (८०) व इंदूबाई शांताराम पाटणे (८०) अशी या संशयास्पद मृत्यू झालेल्या महिलांची नावे आहेत. हा खून की आकस्मिक मृत्यू याबाबत चर्चेला उधाण आले आहे. मात्र, पोलिसांनी हा खून असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविला आहे. तीन महिलांचा खून झाल्याची रत्नागिरी जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असून या घटनेने जिल्हा हादरून गेला आहे.परबत पाटणे यांच्या घरात वेगवेगळ्या खोलीत या तीन महिलांचे मृतदेह आढळून आले. यामध्ये इंदूबाई पाटणे यांचा मृतदेह हॉलमध्ये, सत्यवती यांचा बेडरूममध्ये तर पार्वती यांचा मृतदेह किचनमध्ये पडला होता. तिघींच्या डोक्यात वार झाले असल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. घटनास्थळी डी.वाय.एस.पी व दापोलीचे पोलीस निरीक्षक दाखल झाले असून पोलीस गुन्हेगाराचा शोध घेत आहेत.खोतवाडीतील मृत तिन्ही वयोवृद्ध महिला रात्री नेहमी एकत्र झोपत असत. नेहमीप्रमाणे त्या काल एकत्र झोपल्या परंतु सकाळी हा दुर्दैवी प्रकार घडला. नेमका हा प्रकार रात्री घडला की सकाळी घडला याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही. पार्वती व सत्यवती या दोघीही सवती असून या दोघींना मूलबाळ नसल्याने पुतण्या सांभाळ करत असल्याचे तपासात समोर आले आहे व शेजारीच असणाऱ्या इंदुबाई पाटणे यांचा मुलगा कामानिमित्त मुंबईत असतो, त्याही घरी एकट्याच असल्याने या तिघी एकत्र राहत असत. मकर संक्रातीच्या दिवशीच हा प्रकार घडल्याने पंचक्रोशीतून हळहळ व्यक्त होत आहे.
दापोली तालुक्यात तीन वयोवृद्ध महिलांची हत्या?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2022 6:31 PM